
पुणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। उसाची वजन चोरी आणि साखर उतारा चोरीबाबतच्या तक्रारींची चौकशी केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेली भरारी पथके कार्यान्वित करून तपासण्या करण्याच्या सूचना प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिल्या आहेत, अशी माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली.
साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधींसमवेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक झाली. यामध्ये उसाच्या वजनातील काटामारी आणि साखर उताऱ्यात होणाऱ्या चोरीबाबत शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी डॉ. कोलते यांच्याकडे संयुक्त केली.दरम्यान, महसुली उत्पन्न विभागणी सूत्रांनुसार (आरएसएफ), हिशेब देणे बंधनकारक असतानाही कारखान्यांनी गतवर्षीचा अहवाल अद्याप दिलेला नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु