
कोल्हापूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
विवाहानंतर निर्माण होणारे कौटुंबिक वाद, पती-पत्नीतील कलह, घरातील समस्या आणि वैयक्तिक अडचणींनी त्रस्त असलेल्या नागरिकांची मानसिकता ओळखून “चुटकी वाजवत समस्या दूर करतो” असा खोटा गाजावाजा करत लोकांना फसवणाऱ्या भोंदू सनी भोसलेला वाई, मुंबई आणि ठाणे परिसरात फिरत असताना करवीर पोलिसांच्या पथकाने अखेर करवीर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. काही दिवसांपूर्वी त्याचे प्रकार उघड झाल्यानंतर तो कोल्हापुरातून फरार झाला होता. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने सनी भोसलेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फुलेवाडी रिंग रोडलगतच्या क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील चार खोल्यांच्या घरात सनी भोसले “दरबार” भरवत होता. भगवे कपडे, भयचकित करणारे हास्य, संमोहनासारखा संवाद आणि चुटकी वाजवत समस्या दूर करण्याचा दावा करत तो गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भुरळ घालत होता. अमावस्या-पौर्णिमेला त्याच्या ठिकाणी मोठी गर्दी होत असे. कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातूनही लोक त्याच्याकडे समस्या घेऊन ओळखीने येत होते.
विशेष म्हणजे अनेक उच्चभ्रू महिलाही त्याच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. महिलांशी गोड बोलून, विश्वास संपादन करीत मानसिक प्रभाव टाकून तो त्यांच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन देत असे. त्यातून महिलांचा आर्थिक आणि वैयक्तिक गैरफायदा घेत असल्याचा संशय असून त्या अनुषंगानेही तपास केला जात आहे.
याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारींनंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याच्यावर लक्ष ठेवले होते. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याच्या दरबारावर छापा टाकला. या वेळी करणी उतरवण्याचे साहित्य, टोणगेबाज वस्तू आणि संशयास्पद साहित्य पोलिसांनी जप्त केले. छाप्यानंतर भोसलेने कोल्हापूर सोडून पळ काढला होता. करवीर पोलिसांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे साताऱ्यातील वाईमार्गे ठाण्यात त्याचा माग काढण्यात आला. अखेर शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी भोसलेला अटक केली.
सनी भोसलेने अनेक महिलांच्या नावावर सिमकार्ड घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, हे सिमकार्ड कोणत्या व्यवहारांसाठी वापरण्यात आले याचा पोलिस तपास करत आहेत. आर्थिक फसवणूक, विश्वासघात आणि भावनिक शोषणाचे अनेक प्रकार आता समोर येण्याची शक्यता आहे.
करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की ज्या व्यक्तींची भोसलेने फसवणूक केली आहे त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी. अशा भोंदू प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहावे
अंधश्रद्धेला थारा न देता कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा पुढील तपास सुरू असून, भोसलेचे अनेक कारनामे आता उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar