
सोलापूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। गेल्या तीन दिवसांत किमान तापमानात 3.6 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने थंडी गायब झाली असून, दुपारी सोलापूर शहर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पुढील आठवडाभर वातावरण ढगाळ राहणार असून, किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
15 नोव्हेंबर रोजी 51.4 अंश सेल्सिअस तर 18 नोव्हेंबर 13.9 अंश सेल्सिअस इतक्या निच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. यंदाच्या मोसमातील सर्वात कमी निच्चांकी तापमानाची नोंद ठरली होती. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला होता. त्यामुळे कुडकुडणाऱ्या थंडीने नागरिक त्रस्त झाले होते.
यंदाच्या वर्षी दिवाळी सण हा थंडीविनाच गेला आहे. दिवाळी संपल्यानंतर 15 दिवसांनी थंडीला सुरुवात झाली. मागील 10 दिवस कडाक्याची थंडी अनुभवल्यानंतर सोलापुरकरांना थंडीपासून दिलासा मिळाला आहे. 19 नोव्हेंबरपासून किमान तापमानात सातत्याने वाढ होत असून, 15.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर 22 नोव्हेंबर रोजी 15.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यात कमाल तापमानात आणखी वाढ होत 17.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड