
अमरावती, 23 नोव्हेंबर (हिं.स.)
जिल्ह्यात आज ३६ केंद्रांवर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत जिल्ह्यात पेपर एकसाठी ५ हजार ८६५ तर पेपर दोनसाठी ९ हजार ३६५ नोंदणी केली. यापैकी पेपर एकसाठी ५ हजार ५३० तर पेपर दोनसाठी ८ हजार ८५६ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. ही परीक्षा सर्व केंद्रांवर सुरळीतपणे पार पडली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज जिल्हा परिषद कन्या शाळा, ज्ञानमाता हायस्कूल आणि होली क्रॉस शाळा येथील शिक्षक पात्रता परीक्षा केंद्राला भेट दिली, तसेच ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सूचना केली. येरेकर यांनी परीक्षार्थींना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. जिल्हा परिषद कन्या शाळा येथील केंद्रालगत जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. या ठिकाणी बांधकामाचा आवाज होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सदर काम परीक्षा काळात बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर त्यांनी होली क्रॉस आणि ज्ञानमाता हायस्कूल येथील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. यावेळीही त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत येणाऱ्या परीक्षार्थींना परीक्षेसाठी बसू देण्याची सूचना केली. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे आधार कार्ड आणि प्रवेश पत्र तातडीने तपासण्यात यावे, त्यांना वर्ग खोल्यांमध्ये प्रवेश देण्यात यावा. परीक्षेदरम्यान परीक्षार्थींना कोणतीही अडचण होणार नाही किंवा बाधा येणार नाही, याची काळजी घेण्याची निर्देश दिले. सदर परीक्षा आयोजनाचे काम जिल्हा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आणि उपाध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परीक्षा संचालन व्यवस्थित व्हावे, यासाठी केंद्रसंचालक, सहाय्यक परिरक्षक, झोनल अधिकारी व परीक्षेशी संबंधित सर्व यंत्रणा होती. जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत परीक्षेचे संपूर्ण संनियंत्रण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आली.
सर्व परीक्षा केंद्रांवर निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस आयुक्त कार्यालय तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी व योजना शिक्षणाधिकारी कार्यालयाचे भरारी पथकाव्दारे परीक्षा केंद्रांना भेटी देण्यात आल्या. संपूर्ण परीक्षा पारदर्शक व शिस्तबद्ध होण्यासाठी परीक्षार्थींची बायोमॅट्रिक, स्क्रिनिंग व फेस रिकगनिशन प्रक्रिया राबविण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी