
ठाणे, 23 नोव्हेंबर (हिं.स.)।
आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण आणि आक्रमक पाठपुराव्यामुळे 'आपला दवाखाना' उपक्रमामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांपासून थकीत असलेला पगार अखेर त्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.
ठाणे महापालिकेने शहरात ४० ठिकाणी सुरू केलेला आपला दवाखाना उपक्रम व्यवस्थापन कंपनीने बंद केल्याने या दवाखान्यात काम करणारे कर्मचारी आणि परिचारिका बेरोजगार झाले होते. त्याचा तीन महिन्यांचा पगारही थकला होता. याबाबत त्यांनी जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.
ठाणे महापालिकेने बंगळुरु येथील कंपनीला कंत्राट दिले होते. ऑक्टोबरपर्यंत या कंपनीकडे कंत्राट होते, मात्र ऑगस्टमध्येच हे दवाखाने बंद पडले. तत्पूर्वी मागील तीन महिन्यांचा पगार देखील कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील कोरडी गेली. या कंपनीला ५६ लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे असले तरी ही कंपनी महापालिकेला दाद देत नव्हती. त्यामुळे महापालिकेने कंपनीकडून सर्व दंड वसूल करून कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार द्यावेत आणि संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी श्री.केळकर यांनी केली होती. ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अन्यथा या कर्मचाऱ्यांचा महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही श्री.केळकर यांनी देत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच याबाबत पाठपुरावाही सुरू ठेवला होता. अखेर प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरू करत डॉक्टर, परिचारिका आदी कर्मचाऱ्यांचे रखडलेले तीन महिन्यांचे पगार त्यांच्या खात्यात जमा केले.
पगार मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी आ.केळकर यांचे आभार मानले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर