
ठाणे, 23 नोव्हेंबर, (हिं.स.) - कळवा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम साळवे आणि त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अंबानी आणि आपल्या मताचे मूल्य समान केले आहे. त्यामुळे आपले बहुमूल्य मत विकू नका. आज तुम्हाला ते एक हजार रूपये देतील. पण, पाच वर्षांचे गणित बांधल्यास दिवसाला वीस पैसे किमंत आपल्या मताची ठरत आहे. स्वतःची किमंत 20 पैसे करू नका. माणुसकी जपणाऱ्या व्यक्तीलाच मत द्या, असे आवाहन केले. तर, गद्दारांना माफ करायचे नाही; आपण येथील 16 पैकी 16 नगरसेवक निवडून आणू, असे मनोज प्रधान यांनी सांगितले.
कळवा येथील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम साळवे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या वेळी फुले नगर, जयभीम नगर, सायबा नगर, जानकी नगर आदी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.
साळवे यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर सभेला संबोधित करताना डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मर्फी कंपनी जवळ हायवे लगत असलेल्या झोपडपट्टीला 1993 साली आग लागली होती. या आगीत 21 जण मृत्युमुखी पडले होते. तत्कालीन नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी प्रयत्न करून तेथील नागरिकांचे कळव्यात पुनःर्वसन केले होते. आज महात्मा फुले नगर म्हणून जे ओळखले जाते ती हीच भीमवाडी झोपडपट्टी आहे. काही वर्षांपूर्वी जयभीम नगर, सायबा नगर, जानकी नगर येथील घरांवर बुलडोझर चालविण्याचा डाव आखला होता. त्यावेळेस मी स्वतः बुलडोझरवर बसलेल्या तहसीलदारांना खाली उतरवले होते. अर्थात ते माझे कर्तव्य असल्याचेच मी मानतो. पण, गेल्या काही वर्षांत येथे दादागिरी वाढली आहे; काही लोक अंमली पदार्थांचा व्यापार करीत आहेत. इथले काही दादा तर कधी शुद्धीतच नसतात. म्हणूनच आपल्याला शुद्धीत असलेले आणि इथल्या माणसाला माणुसकीने वागवणाऱ्या व्यक्तीला आपले प्रतिनिधी करायचे आहे. आज काही लोक आपल्याला सोडून गेले आहेत. त्यांना आपण काय दिले, किती दिले हे जनतेला माहित आहेच. पण, अशा लोकांना त्यांची जागा दाखवा. येथे काही जण लोकांचे आधारकार्ड आणि वोटींग कार्ड घेत आहेत. ते कुणालाही देऊ नका. तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवण्याचा हा डाव आहे, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मनोज प्रधान यांनी, ज्या पक्षाने ओळख दिली. त्यांना सोडून जाणारे लोक गद्दार आहेत. या गद्दारांना माफी नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून 16 नगरसेवक आपलेच निवडून आणायचे आहेत, असे आवाहन केले
या वेळी मंचावर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवक अध्यक्ष अभिजीत पवार, युवती कार्याध्यक्षा पुजा शिंदे - विचारे, मकसूद खान, येरूणकर, माणिक शिंदे, दिनेश बने, संदीप शिंदे, निखील शिंदे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर