
रत्नागिरी, 23 नोव्हेंबर, (हिं. स.) : हेरिटेज वीकचे औचित्य साधून रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि निसर्गयात्रीतर्फे आज अनोखी सायकल स्वारी काढण्यात आली.
रत्नागिरीजवळ कोळंबे येथील कातळशिल्पे पाहण्याकरिता रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि निसर्गयात्री संस्था, आयआयटी एम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशन आयआयटी मद्रास द्वारा संचालित कोकणातील कातळ शिल्प आणि वारसा संशोधन केंद्रातर्फे अनोखी सायकल स्वारी आयोजित केली. या राइडला रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद लाभला.
जागतिक वारसास्थळांमध्ये नामांकन झालेली कातळशिल्पे पाहणे हा या अनोख्या सायकल स्वारीचा उद्देश होता. यामध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य आणि शालेय विद्यार्थी सहभागी झाले. सकाळी जयस्तंभ येथून सायकल स्वारीला सुरवात झाली. सागरी महामार्गाने भाट्ये, फणसोपमार्गे कोळंबे येथील कातळसड्यावर सायकलस्वार पोहोचले. तेथे कातळशिल्प शोधकर्ते सुधीर रिसबूड यांच्यासह कोकणातील कातळशिल्प व वारसा संशोधन केंद्राचे ऋत्विज आपटे, तार्किक खातू, गार्गी परुळेकर व अजिंक्य प्रभुदेसाई आणि अभ्यासक श्रीवल्लभ साठे उपस्थित होते. त्यांनी कातळशिल्पांची सविस्तर माहिती दिली. हरीण, मानवाची प्रतिकृती, प्राण्याच्या पायाचा खूर, मासा अशा विविध कातळशिल्पांची पाहणी व त्याची माहिती या वेळी देण्यात आली.
यामध्ये क्लबच्या सायकलस्वारांसह कातळशिल्प संशोधक, अभ्यासक यांनी सहभाग घेतला. कोळंबे येथील कातळशिल्प समूह पाहून आपल्या प्राचीन वारशाचा खूप अभिमान वाटला. असा वारसा आपण सर्वांनी मिळून जपला पाहिजे याची जाणीव झाल्याचे सहभागींनी सांगितले.
सायकल चालवत पुन्हा रत्नागिरी शहरात राधाकृष्ण चित्रपटगृहाजवळ कोकणातील कातळशिल्प वारसा जतन केंद्राला भेट देऊन सायकलस्वारांनी माहिती घेतली. या केंद्रात कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे वैज्ञानिक अन्वेषण, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्यावर काम करत आहे. कातळाची निर्मिती, कातळशिल्पांची वापरलेली दगडी हत्यारे यासंबंधीची माहिती केंद्रात देण्यात आली.
रत्नागिरीत सुधीर रिसबूड, धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांच्यासह त्यांचे सहकारी प्रचंड मेहनत घेऊन हे काम गेली १४ वर्षे करत आहेत. आतापर्यंत कोकणातील ९ कातळशिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळण्यासाठी संभाव्य यादीत झाला आहे. भविष्यात आणखी कातळशिल्पांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळावे, यातून पर्यटनवाढ, स्थानिक रत्नागिरीकरांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. यातून स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकतो. याकरिता निसर्गयात्री संस्था प्रयत्न करत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी