
नागपूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। मनुष्याला मानवी संवेदना आहेत. ही संवेदना अभिव्यक्त करण्याचे वरदान त्याला लाभले आहे. ही अभिव्यक्ती करण्यासाठी त्याच्याकडे भाषा, साहित्य, पुस्तके ही माध्यमे आहेत. अभिव्यक्ती संपते तिथे संस्कृती संपते. त्यामुळे ही प्रगल्भ संस्कृती जपण्याची गरज असून हा सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम पुस्तकांच्या माध्यमातून होत असते. नागपूर पुस्तक महोत्सवांतर्गत होत असलेल्या झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हलच्या माध्यमातून प्रगल्भता येऊन जाणिवा विस्तारित होतील. विविधांगी विषय या फेस्टिव्हलमध्ये मांडण्यात येतील. त्यातून वैचारिक कक्षा रुंदावून प्रगल्भ व्यक्तिमत्व तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) इंडियाच्या वतीने व महाराष्ट्र शासन आणि झिरो माईल यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर बुक फेस्टिव्हल 2025 अंतर्गत चार दिवसीय ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 23 आणि 24 तसेच 29 आणि 30 नोव्हेंबरदरम्यान हा साहित्य महोत्सव रेशीमबाग मैदानावर होत आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ वर्ध्याच्या कुलगुरू व साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षा डॉ. कुमुद शर्मा, लेखक व शिवकथाकार विजयराव देशमुख, एनबीटीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, झिरो माईल यूथ फाउंडेशनचे मार्गदर्शक सत्यनारायण नुवाल, अध्यक्ष अजय संचेती, संचालक समय बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, नागपूर हे समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून ओळखले जाते. देशाला दिशा देणारे आणि देशाला दिशा देणाऱ्या अनेक घटनांचे साक्षीदार असलेले हे सांस्कृतिक शहर आहे. गोंड राजांनी सार्वजनिक ग्रंथालयाची परंपरा सुरू करून ज्ञानसंस्कृती रुजवली. भोसले काळात हिंदवी स्वराज्याच्या विस्तारात नागपूरने मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्य हे अभिजात आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राजा बढे, राम शेवाळकर, महेश एलकुंचवार, सुरेश भट, ग्रेस, वि.भि. कोलते, ग.त्र्यं. माडखोलकर, मारुती चितमपल्ली, परशुराम खुणे यांच्यासारख्या अनेक साहित्यिकांनी या संस्कृतीला समृद्ध करण्याचे काम केले आहे. विदर्भाची भूमी ही भाषेच्या संगमाची भूमी आहे. मराठी आणि हिंदी साहित्य निर्मितीची समांतर समृद्ध परंपरा येथे पहायला मिळते. लिटरेचर फेस्टिव्हलच्या माध्यमातून नागपूरच्या सांस्कृतिक जडणघडणीत अत्यंत मोठा असा बदल होणार असल्याचे ते म्हणाले.
माहिती ही ज्ञानामध्ये परिवर्तित होत नाही तोवर ती केवळ माहिती असते. त्यामुळे माहितीकडून ज्ञानाकडे जायचे असेल, तसेच ज्ञानी म्हणून नावलौकीक मिळवायचा असेल तर पुस्तकांशिवाय पर्याय नाही. तरुण पिढीपर्यंत पुस्तके पोहोचविण्याची गरज असल्याचेही ते पुढे म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नागपूर बुक फेस्टिव्हलच्या यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले. एनबीटी देशभरात वाचनसंस्कृती पुनर्स्थापित करण्याचे उत्कृष्ट कार्य करीत आहे. या उपक्रमाचा एक भाग असलेले नागपूर पुस्तक महोत्सव नवी उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध पुस्तक प्रकाशनांच्या स्टॅाल्सला भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी बालमंडपला भेट देऊन विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.
वाचन संस्कृती जोपासण्याची गरज — राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, आजच्या काळात वाचनाची गरज सर्वाधिक आहे आणि त्या जाणिवेतून हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. डिजिटल माध्यमामुळे वाचनाला धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या पुस्तक महोत्सवाचे महत्त्व अधिक आहे. वाचन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. या महोत्सवात 300 हून अधिक प्रकाशक आणि 15 लाखांहून अधिक पुस्तके उपलब्ध आहेत. परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. नागरिकांनी या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शिवकथाकार विजयराव देशमुख यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर