परतूरमध्ये रावसाहेब दानवे व बबनराव लोणीकर एका मंचावर
छत्रपती संभाजीनगर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। परतूर येथे झालेल्या भव्य भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात जालना जिल्ह्याच्या राजकारणात मोठे वळण पाहायला मिळाले. या मेळाव्यात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे आ
Q


छत्रपती संभाजीनगर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।

परतूर येथे झालेल्या भव्य भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात जालना जिल्ह्याच्या राजकारणात मोठे वळण पाहायला मिळाले. या मेळाव्यात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर हे दोघे प्रथमच एका मंचावर दिसले. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या चर्चांना आणि राजकीय अंदाजांना विराम मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मेळावा आमदार लोणीकर यांच्या निवासस्थानी झाला. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, स्वागत फलक, घोषणांचा गजर आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे परतूर शहर राजकीय रंगात रंगले होते. मेळावा सुरू होताच घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या वेळी मार्गदर्शन करताना रावसाहेब दानवे यांनी भाजपा ही संघटन, शिस्त आणि सेवाभावावर उभी राहिलेली पक्षसंरचना असल्याचे सांगितले. जालना जिल्ह्यात आता खरी एकजूट असून आगामी निवडणुकांत भाजपा मोठा विजय मिळवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी एक महत्त्वपूर्ण राजकीय घोषणा करत सांगितले की परभणी लोकसभा मतदारसंघातून भाजपा तिकीट बबनराव लोणीकर यांनाच मिळावे यासाठी ते स्वतः प्रयत्न करणार आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना आमदार बबनराव लोणीकर यांनी मोठा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले की आता ते परतूर–मंठा विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवणार नसून आगामी निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवून संसदेत प्रतिनिधित्व करणार आहेत. मतदारसंघातील विकासकामे, जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचे योगदान हेच माझे राजकीय बळ असल्याचे त्यांनी सांगितले.

या दोन्ही नेत्यांची संयुक्त उपस्थिती आणि झालेल्या राजकीय घोषणा पाहून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मेळावा यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमानंतर कार्यकर्त्यांनी भाजपा पक्ष आगामी काळात अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला असून परतूर-मंठा आणि परभणी लोकसभा मतदारसंघातील आगामी राजकीय समीकरणे आता संपूर्णपणे बदलणार असल्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande