
परभणी, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। “विकासकामे करायची असतील तर लोकप्रतिनिधित धमक आणि ताकद असावी लागते; हे येरागबाळाचे काम नाही,” असे जिंतूर नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर जोरदार भाष्य केले. सभास्थळी येताना रस्त्यावर दिसणारा कचरा व प्लास्टिकचे ढिगारे पाहून त्यांनी जिंतूर शहरातील विकासाच्या मागासलेपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सोमवारी दादा शरीफ चौक परिसरात आयोजित या प्रचार सभेत ते पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या समर्थनार्थ बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर, माजी आमदार विजय भांबळे, सुरेश नागरे, प्रेक्षा भांबळे, अमृता नागरे तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सबिया बेगम कफिल फारूखी उपस्थित होते.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “जिंतूर शहराच्या विकासाचा बॅकलॉग अनेक वर्षांपासून वाढत आहे. रस्ते, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा तसेच मुस्लिम समाजासाठी शादीखाना, मंगल कार्यालय, नाट्यगृह अशी अनेक महत्त्वाची कामे प्रलंबित आहेत. माजी नगराध्यक्ष दिवंगत कफिल फारूखी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या पत्नी आणि सर्व उमेदवारांना विजयी करा.”
तसेच माजी आमदार विजय भांबळे यांनी मांडलेल्या शादीखाना, मंगलकार्यालय आणि कचरा व्यवस्थापनासंबंधीच्या प्रमुख मागण्या लवकर मार्गी लावण्याचे आश्वासनही अजित पवार यांनी दिले. यासोबतच जिंतूरसाठी अतिरिक्त जिल्हा न्यायालय मंजूर करण्यासाठी स्वतः प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान परभणी जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये सुरू असलेल्या वाद-विवादांकडे लक्ष वेधत पवार म्हणाले की, “आचारसंहितेचे नियम काटेकोर पाळा. कोणत्याही प्रकारचा विरोधक त्रास देत असल्यास वरिष्ठांना कळवा; शांतता बिघडवू नका.” या जाहीर सभेला जिंतूर शहरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis