
अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांना तब्बल सहा दिवस निवडणूक चिन्हाविना प्रचार करावा लागणार आहे. वैध-अवैध ठरलेल्या अर्जावरील अपिलाचा निकाल २५ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यामुळे अपक्ष असलेल्या उमेदवारांना २६ नोव्हेंबर रोजी चिन्ह मिळणार असून, त्यानंतर चिन्हासह प्रचार करण्यासाठी केवळ चार दिवस मिळणार आहेत.
नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. उमेदवारांचे अर्ज पात्र आणि अपात्र ठरल्यानंतर २१ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. जिल्ह्यातील ४२ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर अपिलातील अर्जावर निकाल लागेपर्यंत अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.२६ नोव्हेंबर रोजी चिन्हांचे वाटप होणार आहे. त्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी प्रचार संपणार आहे. त्यामुळे केवळ चार दिवसांमध्ये अपक्ष उमेदवारांना प्रचार करावा लागणार आहे.
चिन्हावर प्रचार फक्त चार दिवसअपक्षांच्या चिन्हांचे वाटप २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे २७ ते ३० नोव्हेंबरपर्यंत म्हणजे फक्त चार दिवस चिन्हावर प्रचार करता येणार आहे. मंगळवार, २ डिसेंबर रोजी निवडणुकीचे मतदान होणार आहे.
पहिल्यांदाच असा निर्णयकोणत्याही निवडणुकीत माघारीच्या दिवशीच चिन्हांचे वाटप केले जाते. त्या दिवसापासून प्रचार साहित्यावर चिन्हांची मोहोर उमटवली जाते. पण पहिल्यांदाच एवढा मोठा गॅप असून, माघारीनंतरचे सहा दिवस अपक्षांना फक्त आपल्या नावाचा प्रचार करावा लागणार आहे.अपिलात दाखल केलेल्या दाव्यांचा निकाल २५ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या दिवसापर्यंत माघारीची अंतिम मुदत असल्याने २६ तारखेला अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. त्यानंतर खऱ्या प्रचाराला सुरुवात होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी