
रायगड, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। “मी आगरी असल्याने आगरी माणसाशी कधीही भांडत नाही. समाजात कोणत्याही कारणाने वाद उद्भवला, तरी एक पाऊल मागे येऊन शांतता राखा,” असा ऐक्य आणि संयमाचा संदेश हभप जयेश महाराज भाग्यवंत यांनी दिला. कर्जत तालुका आगरी समाज संघटना आणि आगरी ग्रंथालय चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेरळ येथील आगरी समाज हॉलमध्ये आयोजित ‘आगरी शाळा’ या एकदिवसीय कार्यशाळेत त्यांनी आगरी भाषेतील पहिले प्रवचन सादर करत समाजाला भाषिक आणि सांस्कृतिक बांधिलकीची आठवण करून दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हभप विजया महाराज पाटील यांनी भाग्यवंत महाराजांचा परिचय करून दिला. यावेळी हभप शिवनाथ बाबा आणि संघटनेचे अध्यक्ष संतोष पेरणे यांनी संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट देऊन त्यांचा सन्मान केला. आपल्या प्रवचनात हभप जयेश महाराज म्हणाले की, आगरी भाषा टिकून राहणे ही काळाची गरज आहे. “आज बहुतेकांची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात, परंतु घरातील बोली भाषा आगरी असेल, तर आपली संस्कृती कधीही नष्ट होणार नाही,” असे ते म्हणाले. आगरी घरातील संस्कारच ही भाषा जिवंत ठेवतात, या विश्वासाची अनुभूती त्यांनी व्यक्त केली.
समाज शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जात असला, तरी बोलीभाषेतून आगरीपण व्यक्त न केल्यास आपली ओळख हरवू शकते, असेही त्यांनी सांगितले. “मी शेंडी ठेवतो म्हणून अनेकांना मी आगरी आहे हे समजत नाही; पण बोलीभाषा ही आगरी असली, की आपली ओळख कायम राहते,” असे ते म्हणाले.मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आगरी बांधव भेटल्यावर बोलीभाषा ओळखीचे पूल बांधते, असे सांगत लहानसहान वाद किंवा गैरसमज निर्माण झाल्यास समोरची व्यक्ती आगरी असल्याचे लक्षात घेत शांततेने पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके