ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी; मनसे-भाजपा आमनेसामने
ठाणे, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। ठाण्यात गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षा चालकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव घेत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. किरकोळ वादातून हा रिक्षा चालक आक्रम
misdemeanor in Thane


ठाणे, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। ठाण्यात गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षा चालकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव घेत शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. किरकोळ वादातून हा रिक्षा चालक आक्रमक झाल्याचं समोर आलं असून, “मनसेची नाही, भय्यांची चालणार” असे उद्धट वक्तव्य त्याने केले. या प्रकरणी ठाणे चितळसर पोलिसांनी त्या रिक्षाचालकाला अटक केली आहे. व्हिडिओमध्ये तो राज ठाकरे आणि मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांचं नाव देखील घेत शिवीगाळ करताना दिसत आहे.

या घटनेवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देताना मनसेवर निशाणा साधला.“संपूर्ण देशाला माहिती आहे, कोण भाषावाद, प्रांतवादाची प्रक्षोभक विधानं करुन माथी भडकवतय. तुम्ही स्वत:च्या मुलांना बॉम्बे स्कॉटिश शाळेत पाठवणार. तुमची मुलं जर्मन, फ्रेंच भाषा शिकणार. जावेद अख्तर शिवाजी पार्कवर तुमच्यासमोर हिंदीमध्ये बोलतात आणि तुम्ही हिंदीला विरोध करता. इतकी दुटप्पी, ढोंगीपणाची दुसरी कोणती भूमिका असू शकत नाही” अशी टीका साटम यांनी केली.

तर या प्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला. “ठाणे हा मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे. निवडून आले म्हणजे बालेकिल्ला होतो का?. आज आमच्याकडे पण हजारो पोरं आहेत, मराठी माणसासाठी अंगावर जाणारी. ठाणे हा मराठी माणसाचा बालेकिल्ला असून आम्ही रक्षणकर्ते आहोत” असे ते म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरे यांनी काल परळ येथील मालवणी जत्रोत्सवात भाषण करताना महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी स्पष्ट केली. “रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका. आजूबाजूला कोण खरे, कोण खोटे मतदार, हे पहा. पुढील निवडणूक महत्त्वाची आहे, ही शेवटची महापालिका निवडणूक ठरू शकते,” असा इशारा त्यांनी दिला.

महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी जानेवारीत लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande