
अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.)
नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उमेदवार प्रचारासाठी रस्त्यावर सक्रिय झाले आहेत. प्रचाराला वेळ कमी मिळत असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. शहरातील गल्ली-बोळांत उमेदवारांच्या भेटीगाठी पदयात्रा आणि सोशल मीडिया मोहिमा वेगाने सुरूआहेत. तथापि, या धामधुमीत एक गोष्ट ठळकपणे जाणवत आहे.प्रचारात विकास' हा मुख्य मुद्दा मात्र गायब झालेला दिसत आहे. उमेदवारांना सगळे सोयरे व मित्रांची निवडणुकीच्या निमित्ताने आठवण येत आहे. अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण या नागरिकांच्या मुख्य गरजांवर बोलण्यास अनेक उमेदवार टाळाटाळ करताना दिसत आहेत.मोठमोठी आश्वासने, भावनिक नारे आणि पक्षीय समीकरणे पुढे येत असताना शहराच्या खऱ्या विकासाचा अजेंडा कुठेतरी हरवलेला आहे, असे दिसत आहे.प्रचारात धावपळ, उमेदवारांची घराघरातील धडक भेटी आणि कार्यकर्त्यांची धावपळ यामुळे शहराचे वातावरण निवडणुकीच्या रंगात बुडाले आहे. मात्र, मतदारांमध्ये एक प्रश्न ठळकपणे उमटत आहे. विकासाच्या नावाने मत मागताय, पण विकासाचाच मुद्दा कुठे आहे? कमी वेळ, वाढलेली स्पर्धा आणि बहुरंगी लढती यामुळे निवडणूक यंदा रोचक ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी