
परभणी, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे (शिंदे गट) एकनाथ (पप्पू) घाडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
पाथरी येथील बाजार समितीमध्ये राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात झाली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी शिवसेनेच्या शिंदे गटातील काही सदस्यांना सोबत घेत सभापती अनिल नखाते यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला व तो मोठ्या फरकाने पारितही झाला. या नंतर बाजार समितीच्या सभापती पदी शिवसेनेचे एकनाथ घाडगे हे विराजमान होतील, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे जिल्हा उपनिबंधक संदीप तायडे यांच्या उपस्थितीत सभापती निवडीची बैठक घेण्यात आली. विरोधी गटातील पाच संचालक बैठकीस हजर राहील्याने एकनाथ उर्फ पप्पू घाडगे यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर घाडगे समर्थकांनी यावेळी जोरदार आनंदोत्सव साजरा केला. यावेळी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी घाडगे यांना बाजार समितीमध्ये हजर राहून शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, या निवडीनंतर पाथरीत शिवसेना शिंदे गटातील गटबाजी प्रकर्षाने समोर आली आहे. माजी जिल्हाप्रमुख नाना टाकळकर व नवनिर्वाचित सभापती घाडगे यांचा ग्रामीण गट तर प्रभारी जिल्हाप्रमुख सईद खान यांचा दुसरा एक गट कार्यरत झाल्याने राजकीय गणिते बदलली आहेत. या निवडीचा होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणूकीवर काय परिणाम होतो, हे येणार्या काळात समोर येणारच आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी बाजार समितीच्या राजकारणात जिल्हाध्यक्ष होताच प्रवेश करुन आखण्यात आलेली रणनीती यशस्वी करुन दाखवली. शिवसेनेच्या सहा संचालकांना सोबत घेत बाजार समिती ताब्यात घेतली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis