
सोलापूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)।
राज्यातील दोन कोटी ५९ लाख लाडक्या बहिणींमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख नऊ हजार महिला होत्या. पण, योजनेच्या निकषांनुसार झालेल्या पडताळणीत आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाखांवर महिलांचा लाभ बंद झाला आहे. आता वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असलेल्यांचा लाभ बंद होणार आहे. त्यासाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करावी लागणार आहे.राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. दोन महिन्यांतच राज्यातील अडीच कोटींहून अधिक महिलांनी योजनेसाठी अर्ज केले. त्यात सरकारी नोकरदार महिला, पुरुष, प्राप्तीकर भरणाऱ्या महिला, चारचाकी वाहने असलेल्या, २१ पेक्षा कमी व ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिला, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांनीही अर्ज केले. त्यांना सुरवातीला तीन-चार महिने लाभ मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड