
अमरावती, 24 नोव्हेंबर (हिं.स.) महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरी अंतर्गत आज, रविवारी ‘सखी गं सखी’ हे नाटक सादर झाले. फक्त महिलांचा समावेश असलेल्या या नाट्याद्वारे रसिकांना नोकरदार महिलांच्या वेगवेगळ्या भूमिकांची ओळख झाली. संवाद प्रधान असलेले हे नाटक आहे. पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज परिसर येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृहात नेहमीप्रमाणे सायंकाळी ७ वाजता नाटकाचा प्रारंभ झाला. नाट्य प्रयोगाच्या सुरुवातीला रंगमंचावर एक ‘टॉक शो’ सुरू असतो. तो केवळ स्त्रियांसाठी आणि स्त्रियांच्या अनुभवावर आधारित असतो. या कार्यक्रमाची सूत्र संचालिका प्रगल्भ आणि समजूतदार आहे. स्त्रीच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रवासातले सत्य, माध्यमांचा प्रभाव आणि स्त्रीच्या प्रतिमे वरचा परिणाम, संघर्ष, वाट बघणं, प्रामाणिकपणा आणि आकांक्षा यांचा ताळमेळ दाखवण्याचा प्रयत्न या नाटकातून सादर करण्यात आला. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही राज्य नाट्य स्पर्धा सुरु असून रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अ. भा. नाट्य परिषदेचे विश्वस्त ॲड. प्रशांत देशपांडे, नाट्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲड. चंद्रशेखर डोरले आणि समन्वयक विशाल फाटे त्यासाठी स्थानिक पातळीवर परिश्रम घेत आहेत. छोट्या गावातील संस्थेची नाट्य निर्मिती भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभू या छोट्याशा गावातील समर्पण बहुउद्देशीय संस्था या नाटकाची निर्माती आहे. डॉ. पराग घोंगे यांनी या नाटकाचे लेखन केले असून दिग्दर्शन किशोर पाचकवडे यांचे आहे. यात आंचल गजभिये, सोनू तारपुरे, काजल देशमुख, मयुरी राणे आणि प्रियांका नवाथे यांनी अभिनय केला आहे. नेपथ्य रिंकू सरोदे, पार्श्व संगीत प्रज्वल तायडे, प्रकाशयोजना सागर उदासी, रंगभूषा रवीना भुरभुरे आणि वेशभूषा कुंदाताई वंजारी यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी