
रायगड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। आगामी खोपोली नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस जोरदार वेग येत असून, विविध प्रभागांमध्ये होत असलेल्या सभांना, पदयात्रांना आणि घर-घर संपर्क मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडत विकासाची हमी देणाऱ्या शेंडेंची प्रतिमा मतदारांमध्ये मजबूत होताना दिसत आहे.
प्रभागांमध्ये फिरताना त्यांना युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून मिळणारा उत्साहपूर्ण प्रतिसाद लक्ष वेधून घेत आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक कोंडी, जलनिस्सारण यासह दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या समस्यांवर ठोस उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष या निवडणुकीत एकत्र मैदानात उतरले असून शेंडेंच्या उमेदवारीला मिळणारा पाठिंबा यामुळे अधिक बळकट झाल्याचे पक्षातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
कुलदीपक शेंडे यांनी विविध भागात घेतलेल्या सभांमध्ये “खोपोलीचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचा सहभाग” या संकल्पनेवर भर दिला आहे. शहरातील मूलभूत सुविधा सक्षम करणे, उद्योगांना प्रोत्साहन आणि रोजगारनिर्मिती, स्वच्छता अभियान यावर त्यांनी विशेष भर दिला. नागरिकांच्या दैनंदिन समस्या प्रत्यक्ष ऐकून तातडीने निराकरण करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
निवडणूक प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू असताना खोपोलीतील वातावरण अधिकच तापत आहे.
प्रतिस्पर्धी पक्षही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतानाच, शेंडे यांच्या प्रचारात दिसणारी आघाडी महायुतीच्या विजयाची शक्यता वाढवत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.
खोपोलीतील अवघ्या काही दिवसांवर आलेल्या निवडणुकीकडे संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले असून, नागरिकांच्या निर्णयावर निवडणुकीचे भविष्य अवलंबून राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके