
रायगड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। मौजे चेंढरे (पश्चिम) येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणात महसूल प्रशासनाने कडक भूमिका घेत कार्यवाहीचे स्पष्ट आदेश दिले आहेत. श्री ऋषभ मयूर अजमेरा यांच्या नावावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करून, चौकशी अहवालाच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ मधील कलम ५२ ते ५७ अन्वये तातडीने कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
या प्रकरणाची सुरुवात श्री प्रल्हाद सुधाकर म्हात्रे यांनी दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोजी केलेल्या लिखित तक्रारीपासून झाली. त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले की चेंढरे हद्दीतील रस्त्यालगत कोणतीही वैध परवानगी न घेता अतिक्रमण करून उंच भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम रस्त्याच्या वळणावर असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, त्यामुळे गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे, अशी तक्रार श्री. म्हात्रे यांनी केली होती.स्थानिक नागरिकांनीही या अनधिकृत बांधकामामुळे वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाल्याचे अनेकदा प्रशासनाकडे मांडले आहे. रस्त्याच्या वळणावर अचानक उभी केलेली भिंत वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून, दुर्घटनेची शक्यता सतत वाढत आहे. नागरिकांनी या संदर्भात तातडीने आणि कायदेशीररीत्या कारवाई व्हावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
प्रशासनाने दिलेल्या आदेशांनुसार प्रत्यक्ष पाहणी आणि चौकशी प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून, अनधिकृत बांधकाम आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. या कार्यवाहीमुळे ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांविरोधात ठोस संदेश जाईल, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके