
रायगड, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। एसटी महामंडळाने प्रवाशांना अधिक सुलभ सुविधा देण्यासाठी कागदी पासच्या जागी आधुनिक स्मार्टकार्ड योजना राज्यभर लागू केली होती. मात्र ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीप्रमाणे ही योजना काही काळ सुरळीत सुरू राहिल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि नियमित प्रवासी यांना आजही कागदी पास आणि आधारकार्डच्या आधारावरच प्रवास करावा लागत असून, स्मार्टकार्डची प्रतीक्षा कायमच आहे.
एसटीत ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्यासाठी सुरुवातीला तहसीलदार कार्यालयातून मिळणाऱ्या दाखल्यांचा वापर केला जायचा. नंतर आधारकार्डावर ही सुविधा देण्यात आली; परंतु कार्ड हरवणे, खराब होणे याच्या तक्रारी वाढत होत्या. त्यावर उपाय म्हणून 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीने स्मार्टकार्ड योजना सुरू केली. बसआगारातील आरक्षण कक्षांत यासाठी स्वतंत्र कार्यालयेही उघडण्यात आली. नोंदणी केल्यानंतर एक ते दोन महिन्यांत कार्ड मिळत असल्याने नागरिकांनी याला मोठा प्रतिसाद दिला. पुढे विद्यार्थ्यांना आणि इतर पासधारकांनाही स्मार्टकार्ड देण्यास सुरुवात झाली. यामुळे कागदी पासच्या त्रासातून सुटका झाल्याने प्रवासी समाधानी होते.
मात्र, स्मार्टकार्ड निर्मितीचे काम पाहणाऱ्या कंपनीचा सर्व्हर ठप्प झाल्याने ही सेवा बंद पडली. नवीन कार्ड वितरणाबरोबरच जुन्या कार्डांचे नूतनीकरणही थांबले. 2016 पासून सुरू असलेली योजना हायटेक ओळख प्रणाली मानली जात होती. कार्ड स्कॅन करून प्रवाशांची नोंदणी होत होती. तथापि, सेवा बंद झाल्याने पुन्हा कागदी पास आणि आधारकार्ड यांच्यावरच विसंबून प्रवास सुरू आहे.
लवकरच समस्या मार्गी लावून स्मार्टकार्ड वितरण पुन्हा सुरू केले जाईल, अशी माहिती रायगड विभागाचे विभाग नियंत्रक सुनील चौरे यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके