
अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.) | नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जसा जोमात आला आहे, तशी राजकीय समीकरणांची घडीही जलद गतीने बदलत आहे. शहरात विकासकामे, पाणी-रस्ते, स्वच्छता या मुद्द्यांइतकीच जातीय भूमिका आणि समाजघटकांच्या एकजुटीचा प्रभाव या निवडणुकील ठळकपणे जाणवत आहे. उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचाराच्या रणनीतीपर्यंत जातीय गुणाकार महत्त्वाचा घटक ठरत आहे.
मतदार विविध स्तरांवर उमेदवारांचे मूल्यमापन करत आहेत. जातीचे संतुलन, उमेदवाराचा स्वभाव, प्रतिमा, प्रभागातील पूर्वी केलेली कामगिरी, विकासाची हमी, पक्षाची ताकद, यामुळे अंतिम क्षणापर्यंत कोणत्या प्रभागात कोण बाजी मारेल याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. शहरातील बाजारपेठ, बसस्टॅन्ड परिसर, नवीन वसाहती, जुन्या वस्ती भागात राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. दुकानांपासून चहाच्या टपऱ्यांपर्यंत, सर्वत्र निवडणुकीची चर्चा रंगत आहे.जातीय ध्रुवीकरणाचे संकेत; पण विकासही मुद्द्यावरजातीय रचनेनुसार मते पडण्याची शक्यता असली, तरी अनेक मतदार स्थानिक कामगिरी, सुविधांची उपलब्धता, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि प्रभागातील विकास या मुद्द्यांवरही मतदान करणार असल्याचे सांगत आहेत. काही तरुण मतदार जातीय राजकारणाला फारसा भाव न देता शहराचा सर्वांगीण विकास, डिजिटल सुविधा, क्रीडा-सुविधा अशा मुद्द्यांवर भर देत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी