

घुमान (पंजाब), ३ नोव्हेंबर (हिं.स.) : महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि पंजाबच्या गुरु गोविंदसिंहजींची भूमी ही संतांची, शूरांची आहे. राजगुरू आणि भगतसिंहांचे क्रांतिकारी वारस आपण जपतो. दोन्ही राज्यांमध्ये आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नाते अतूट आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 755 व्या प्रकाशोत्सवाच्या औचित्याने पंजाबमधील घुमान येथे रविवारी आयोजित भव्य कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावून समाजाला एकात्मता, विनम्रता आणि मानवतेचा संदेश दिला. या प्रसंगी त्यांना ‘संत नामदेव महाराज सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, तसेच महाराष्ट्र सदनाच्या भूमिपूजनाचा सोहळाही पार पडला.
शिंदे म्हणाले,“ सकाळी पंढरपूरात विठ्ठल-पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि संध्याकाळी घुमानमध्ये बाबाजींचे दर्शन लाभले, हा अलौकिक योग आहे. माझ्या आयुष्यात अनेक पुरस्कार मिळाले, पण हा सन्मान विशेष आहे, कारण तो जनतेच्या प्रेमाचा आणि संत परंपरेच्या आशीर्वादाचा आहे.
“जात-धर्माचा भेद न मानता मानवतेसाठी कार्य करणारे संत नामदेव महाराज हे जगाला विनम्रतेचे व प्रेमाचे धडे देणारे होते. कुत्रा पोळी घेऊन पळाला तर त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावणारे नामदेव महाराज ही मानवतेची शिकवण आजही प्रेरक आहे,” असे शिंदे म्हणाले.
घुमानमध्ये उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र सदनाबाबत ते म्हणाले, “घुमानचे नाव देश-विदेशात उजळावे, यासाठी आम्ही बांधिल आहोत. रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामेही लवकर पूर्ण होतील.” शिंदे यांनी पंजाबचे मुख्यमंत्री यांनी या जागेसाठी दिलेल्या दोन एकर जमिनीबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली.
“1984 च्या दुर्दैवी काळात आमचे मार्गदर्शक बाळासाहेब ठाकरेंनी शीख बांधवांच्या सुरक्षेला धर्म मानले. आजही आम्ही तोच बंध जपत आहोत. कोणतीही अडचण आली तर शीख बांधवांसाठी माझे घर सदैव खुले आहे. मी कार्यकर्ता असो वा मुख्यमंत्री, सेवा हेच माझे कर्तव्य आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
“माझ्या राजकीय जीवनात मला काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे 'वीर महादजी शिंदे पुरस्कार', देहू येथे 'संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुरस्कार', त्यानंतर पंढरपूरमध्ये 'संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार' मिळाले. आज पुन्हा घुमान येथे हा प्रतिष्ठेचा ' संत नामदेव महाराज पुरस्कार' मिळणे माझ्यासाठी भाग्य आहे,” असे शिंदे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी