
मुंबई, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। मेटा-मालकीच्या व्हॉट्सअॅपनं अॅपल वॉचसाठी खास नवीन अॅप लाँच केलं आहे. या अॅपमुळं वापरकर्त्यांना सूचना पाहणे, संदेश वाचणे, पाठवणे आणि व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करण्याची सुविधा मिळणार आहे. कंपनीच्या ब्लॉग पोस्टनुसार, ही सुविधा खास अॅपल वॉच वापरकर्त्यांसाठी असून, चॅट्सवर अधिक नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. पहिल्यांदाच अॅपल वॉचवरील व्हॉट्सअॅप अनेक फीचर्सला सपोर्ट करणार आहे.
या अॅपद्वारे वापरकर्ते कॉल सूचना पाहू शकतात, पूर्ण संदेश — अगदी मोठे मेसेजेसदेखील — वाचू शकतात आणि व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करून थेट पाठवू शकतात. याशिवाय, इमोजीच्या माध्यमातून संदेशांना रिअॅक्ट करण्याचीही सुविधा उपलब्ध आहे. अॅपल वॉचवर चित्रे आणि स्टिकर्स अधिक स्पष्ट दिसतील, तसेच चॅटिंग करत असलेल्या व्यक्तीचा चॅट इतिहास थेट वॉचवर पाहता येईल. फोन अॅप आणि वेब व्हर्जनप्रमाणेच, या अॅपवरील सर्व संदेश आणि कॉल्स एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असतील, म्हणजे संपूर्ण सुरक्षितता राखली जाईल.
हे अॅप वापरण्यासाठी अॅपल वॉच सीरिज 4 किंवा त्यापुढील मॉडेल आणि वॉचओएस 10 किंवा त्यापुढील व्हर्जन आवश्यक आहे. यंदा व्हॉट्सअॅपनं अॅपल इकोसिस्टमकडं विशेष लक्ष केंद्रित केलं असून, काही महिन्यांपूर्वी आयपॅडसाठी स्वतंत्र अॅप लाँच केलं होतं. तथापि, अॅपल वॉचवरील या नवीन अॅपमध्ये अजूनही काही मर्यादा आहेत — वापरकर्त्यांना व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल करता येणार नाहीत, नवीन चॅट सुरू करता येणार नाही आणि स्टेटस अपडेट्सही पाहता येणार नाहीत.
तरीही, हे अॅप दैनंदिन चॅटिंगसाठी उपयुक्त ठरेल, असं मानलं जातंय. आयफोनशिवाय थेट घडाळातून संदेश हाताळणे हे अॅपल यूजर्ससाठी मोठं पाऊल ठरतंय. भविष्यात या अॅपमध्ये कॉलिंग किंवा स्टेटस फीचरही समाविष्ट होण्याची शक्यता आहे. स्मार्टवॉचेसच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे अशी अॅप्स पुढील काळातील डिजिटल संवादाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहेत. दरम्यान, व्हॉट्सअॅपचा प्रतिस्पर्धी स्नॅपचॅटनंही अॅपल वॉचसाठी अॅप लाँच केलं आहे, मात्र त्याची कार्यक्षमता मर्यादित असून स्नॅप्स किंवा फोटो पाहण्याची सुविधा त्यात उपलब्ध नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule