
मुंबई, 5 नोव्हेंबर (हिं.स.)। मोटोरोलानं भारतात आपल्या जी सीरिजमधील नवीन स्मार्टफोन मोटो जी६७ पॉवर ५जी सादर केला आहे. दमदार परफॉर्मन्स आणि दीर्घ बॅटरी लाइफसह हा फोन बजेट सेगमेंटमध्ये आकर्षण ठरत आहे. यात क्वाल्कॉमचा 4nm स्नॅपड्रॅगन 7S Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 2.4GHz पर्यंतची क्लॉक स्पीड आणि अॅड्रेनो जीपीयूच्या जोडीने उत्कृष्ट कार्यक्षमता प्रदान करतो. फोनमध्ये 8GB रॅम असून ती रॅम बूस्ट 4.0 फिचरमुळे 24GB पर्यंत वाढवता येते. स्टोरेजसाठी 256GB पर्यंत इनबोर्ड मेमरीचा पर्याय उपलब्ध आहे.
मोटो जी६७ पॉवर ५जीची किंमत 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे, तर सुरुवातीच्या ऑफरमध्ये हा फोन 14,999 रुपयांना मिळणार आहे. 8GB + 256GB व्हेरिएंट नंतर उपलब्ध होईल. विक्री 12 नोव्हेंबरपासून फ्लिपकार्ट आणि मोटोरोलाच्या वेबसाइटवर सुरू होणार आहे. फोन पँटोन पॅराशूट पर्पल, पँटोन ब्लू क्युराकाओ आणि पँटोन सिलॅन्ट्रो या तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.
हा ड्युअल-सिम स्मार्टफोन अँड्रॉइड 15-आधारित हेलो यूएक्सवर चालतो. मोटोरोलानं एक ओएस अपडेट आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस देण्याचं आश्वासन दिलं आहे. 6.7 इंच फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्लेसह फोन 120Hz रिफ्रेश रेट, एचडीआर10+ सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शनसह येतो. कंपनीनं सांगितलं आहे की या मॉडेलला MIL-810H मिलिटरी ग्रेड ड्रॉप प्रोटेक्शन मिळालं आहे.
कॅमेराच्या बाबतीत मोटो जी६७ पॉवर ५जी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP सोनी एलायटीआ 600 प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड लेन्स आणि ‘टू-इन-वन फ्लिकर’ सेन्सर आहे. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा फोन फुल-एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग, टाइमलॅप्स, स्लो मोशन आणि ऑडिओ झूमसारखे मोड्स सपोर्ट करतो.
कनेक्टिव्हिटी फिचर्समध्ये 5G, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, जीएलओएनएएस, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि बेइदौ सपोर्ट यांचा समावेश आहे. फोनमध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर्ससह डॉल्बी अॅटमॉस आणि हाय-रेझ ऑडिओ सपोर्ट मिळतो. तसेच, याला IP64 रेटिंग असून हे डस्ट आणि स्प्लॅश रेझिस्टंट आहे. मागील पॅनलला व्हेगन लेदर फिनिश दिलं आहे, ज्यामुळे फोनला प्रीमियम लुक मिळतो.
या डिव्हाइसमध्ये 7,000mAh क्षमतेची सिलिकॉन-कार्बन बॅटरी आहे, जी 30W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. मोटोरोलाच्या मते, हा फोन 130 तास म्युझिक, 33 तास व्हिडिओ, 28 तास इंटरनेट आणि 49 तास कॉलिंगचा बॅकअप देऊ शकतो. फोनचं वजन 210 ग्रॅम असून आकारमान 166.23×76.5×8.6mm आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule