
नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी सकाळपासून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत. विमानतळाच्या एअर ट्राफिक कंट्रोल (एटीसी) सिस्टीमध्ये बिघाड झाल्यामुळे दिवसभरात 300 हून अधिक उड्डाणे प्रभावित झाली आहेत.
शुक्रवारी सकाळपासूनच जशी वेळ पुढे सरकत गेली, तशी ही अडचण अधिकच गंभीर बनत गेली. दिल्लीहून विविध गंतव्यस्थानी जाणाऱ्या उड्डाणांमध्ये झालेल्या मोठ्या विलंबामुळे देशभरातील उड्डाणांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
एटीसी प्रणालीतील बिघाडामुळे दिवसभरात शेकडो उड्डाणे त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा 2 ते 2.5 तास उशिरा आहेत. तर सुमारे 3 टक्के उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दिल्लीहून बिहारच्या दरभंगा जाणारी स्पाइसजेटची एक फ्लाइट रद्द झाली आहे, तर काही शहरांच्या उड्डाणांना 5 ते 7तासांचा विलंब झाला आहे. दिल्लीहून वाराणसीकडे जाणारे एक उड्डाण साडेसात तास उशिरा निघाले, तर इंडिगोची देहरादून फ्लाइट 5 तास विलंबित झाली. विमान कर्मचारी आणि एटीसी यांच्यातील संवाद खंडित झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. दीर्घ प्रतिक्षेनंतर एटीसीने मॅन्युअल पद्धतीने कामकाज सुरू केले, ज्यामुळे काही प्रमाणात परिस्थिती सुधारली, परंतु उड्डाणांच्या विलंब आणि रद्द होण्याची प्रक्रिया संपूर्ण दिवस सुरू राहील, असे सांगण्यात आले आहे.
या समस्येचा परिणाम आगमनाच्या उड्डाणांवरही दिसू लागला आहे. कारण अनेक विमानसेवा दिल्लीहून उड्डाण घेऊन पुन्हा दिल्लीला परततात, त्यामुळे त्याही विलंबित होणार किंवा रद्द कराव्या लागणार आहेत. एकंदरीत, आजचा दिवस विमानसेवेच्या दृष्टीने प्रतिकूल ठरत आहे.स्पाइसजेट, एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअर या विमान कंपन्यांनी सांगितले की, दिल्ली विमानतळावरील एटीसी सिस्टममध्ये आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे, त्यामुळे प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या मते, एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टममधील तांत्रिक त्रुटीमुळे उड्डाणे विलंबित होत आहेत. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वाधिक व्यस्त विमानतळ असून, येथे दररोज 1500 हून अधिक उड्डाणे ये-जा करतात.
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने ‘ट्विटरवर (एक्स) केलेल्या पोस्टमध्ये सांगितले की, दिल्ली विमानतळावर उड्डाण संचालनात विलंब होत आहे कारण एअर ट्रॅफिक कंट्रोल डेटाला सपोर्ट करणाऱ्या ऑटोमॅटिक मेसेज स्विचिंग सिस्टममध्ये (एएमएसएस) तांत्रिक बिघाड झाला आहे. नियंत्रक सध्या फ्लाइट प्लॅन मॅन्युअली प्रक्रिया करत आहेत, त्यामुळे काही विलंब होत आहे. तांत्रिक पथके प्रणाली लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी कार्यरत आहेत.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी