रशियाला गेलेला भारतीय एमबीबीएस विद्यार्थ्याचा मृतदेह १९ दिवसांनी सापडला
नवी दिल्ली , 7 नोव्हेंबर (हिं.स.)। रशियातील उफा शहरात 19 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह गुरुवारी, 6 नोव्हेंबर रोजी एका धरणात सापडला. या विद्यार्थ्याचं नाव अजित सिंग चौधरी असून तो राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील ल
रशियाला गेलेला भारतीय एमबीबीएस विद्यार्थ्याचा मृतदेह १९ दिवसांनी सापडला


नवी दिल्ली , 7 नोव्हेंबर (हिं.स.)। रशियातील उफा शहरात 19 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह गुरुवारी, 6 नोव्हेंबर रोजी एका धरणात सापडला. या विद्यार्थ्याचं नाव अजित सिंग चौधरी असून तो राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड तालुक्यातल्या कफनवाडा गावचा रहिवासी होता. अजित 2023 साली एमबीबीएसच्या शिक्षणासाठी रशियाला गेला होता आणि त्याने बश्किर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता.

अजित 19 ऑक्टोबर 2025 रोजी उफा शहरात बेपत्ता झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, तो सकाळी सुमारे 11 वाजता हॉस्टेलमधून दूध आणायला जातो, असं सांगून बाहेर गेला होता, पण तो परतलाच नाही. अलवर सरस डेअरीचे अध्यक्ष नितीन सांगवान यांनी सांगितलं की, अजितचा मृतदेह व्हाईट रिव्हर (सफेद नदी) लगत असलेल्या एका धरणातून सापडला. या घटनेवर रशियातील भारतीय दूतावासाकडून अद्याप अधिकृत निवेदन आलेलं नाही, पण गुरुवारी त्यांनी चौधरी यांच्या कुटुंबाला मृत्यूबाबत माहिती दिली, असं सूत्रांनी सांगितलं.या बातमीनंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे.

या घटनेला १९ दिवस उलटल्यानंतर, काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह अलवर यांनी या प्रकरणावर गंभीर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी गुरुवारी एक्सवर पोस्ट करत सांगितले की, अजितचे कपडे, मोबाइल फोन आणि बूट हे 19 दिवसांपूर्वी नदीकिनारी सापडले होते. त्यांनी शंका व्यक्त केली की, संशयास्पद परिस्थितीत त्या मुलासोबत काही अप्रिय घटना घडली असावी. कफनवाडा गावचा अजित, आपल्या कुटुंबाने मोठ्या आशेने आणि मेहनतीने जमवलेल्या पैशातून वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाला पाठवला होता. आज अजितचा मृतदेह नदीत सापडल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. अलवरसाठी हा अत्यंत दुःखद क्षण आहे — संशयास्पद परिस्थितीत आपण एक होनहार तरुण गमावला आहे. त्यांनी पुढे लिहिलं, “22 वर्षांच्या मुलाच्या बेपत्ता होण्याच्या बातमीने संपूर्ण कुटुंब हादरले होते. त्याच्या सुखरूपतेसाठी सर्वजण प्रयत्न आणि प्रार्थना करत होते.”

काँग्रेस नेत्याने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना विद्यार्थ्याचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं. त्यांनी म्हटलं , “भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्री जयशंकरजींना विनंती आहे की अजितचा मृतदेह तात्काळ भारतात आणण्यात यावा. संशयास्पद परिस्थितीत या मुलासोबत काही अनर्थ झाला आहे, याची सखोल चौकशी व्हावी. कुटुंबाला आता सरकारी कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत.”

दरम्यान, ऑल इंडिया मेडिकल स्टुडंट्स असोसिएशन च्या फॉरेन मेडिकल स्टुडंट्स विंगने देखील या प्रकरणात परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी संपर्क साधला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande