


मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.) - एनडीएने लालूप्रसाद यादव यांच्या “जंगलराज”ला पूर्णविराम दिला आहे. बिहार पुन्हा त्या काळात जाऊ नये, म्हणून आगामी निवडणुकीत एनडीएच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून द्या, असे जोरदार आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
बिहार-चंपारण येथील एनडीएच्या भव्य जनसभेत शिंदे यांनी विरोधकांवर घणाघाती प्रहार करत, “पाच पक्ष म्हणजे पांडव, तर विरोधक म्हणजे कौरव. आता निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर या कौरवांचा संहार करा!” असा जोरदार हल्ला चढवला.
राहुल गांधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधत शिंदे म्हणाले, “जे वोट चोरीचा आरोप करतात, त्यांनी त्यांच्या राजकारणात नोट चोरी केली आहे. काँग्रेसने नेहमी देशाची फसवणूक केली, आणि आता हार पत्करण्याची तयारी करत आहेत.”
जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्यावर नाव न घेता प्रहार करत शिंदे म्हणाले, “थियरीत पास, पण प्रॅक्टिकलमध्ये फेल, असे काही लोक आज राजकारण शिकवत फिरतात!”
शुक्रवारच्या भव्य सभेत “विकास विरुद्ध जंगलराज” हा मुद्दा पुन्हा एकदा जोरदारपणे मांडण्यात आला. बिहारच्या मतदारांना एनडीएच्या बाजूने एकत्र येण्याचे आवाहन शिंदे यांनी केले.
बिहारवासीयांचा या सभेत उत्स्फूर्त सहभाग होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, “बिहारचा भविष्याचा रस्ता ‘डबल इंजिन सरकार’कडेच आहे.”
सचिंद्रप्रसाद सिंह (कल्याणपूर) आणि राजू तिवारी या एनडीएच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन शिंदे यांनी केले. त्यांच्या विकासनिष्ठ कार्यपद्धती आणि प्रामाणिकतेचा गौरव केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या डबल इंजिन सरकारने बिहारच्या विकासाला वेग दिला आहे, हे त्यांनी ठळकपणे सांगितले.
या सभेला बिहारमधील अधिकारी, कामगार, विद्यार्थी, व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सांगितले, “मुंबईतील लाखो बिहारवासीयांचा पाठिंबा हा निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.” प्रत्येकाने आपल्या परिचितांना मतदानासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.
एनडीए सरकारने मागील काही वर्षांत अब्जावधी रुपयांच्या विकास प्रकल्पांना गती दिली आहे. रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधा, वीज, रस्ते, रेल्वे आणि सामाजिक कल्याण योजनांवर भर देण्यात आला.
महिलांसाठीच्या ‘लाडली योजना’, सामाजिक सुरक्षा व आत्मनिर्भरतेच्या उपक्रमांमुळे बिहारमधील महिलांना नवे बळ मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांवर भ्रष्टाचार, गुंडागिरी आणि अराजकतेचे आरोप करत स्पष्ट केले की
“बिहारमध्ये विकास हवा असेल, तर एनडीए सरकारच हवे. विरोधकांकडे फक्त आरोप आहेत, आमच्याकडे काम आणि दृष्टिकोन आहे!” सभेतून शिंदे यांनी स्पष्ट संदेश दिला की, बिहार पुन्हा जंगलराजात जाणार नाही; बिहारचा मार्ग फक्त विकासाचा आहे.
“मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत हे बिहारच्या विकासाचे शस्त्र आहे. चला, पुन्हा एकदा एनडीएला विजयश्री देऊया”, असे शिंदे त्यांनी आवाहन केले.
यावेळी भाजपचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा, अजय यादव, वीरेंद्र पटेल, बाबू साहेब, पप्पू कुशवाहा, रमेश पासवान, श्रीमती प्रभावती देवी, नागेंद्र मिश्र, संजय कुमार सिंह, आणि एनडीए मधील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच हजारो बिहारी बंधू भगिनी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी