
नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ गीतातून दुर्गा मातेशी संबंधीत ओळी वगळून काँग्रेसने सांप्रदायिक अजेंड राबवल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप प्रवक्ते सी.आर. केसवन यांनी जवाहरलाल नेहरूंच्या पत्रांचा संदर्भ देत सदर आरोप केला असून राहुल गांधी यांची मानसिकता देखील नेहरूंसारखीच असल्याचा टोला लगावला आहे.
राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ च्या रचनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात सहभाग घेतला. याच पार्श्वभूमीवर भाजपने काँग्रेसवर राष्ट्रीय गीताचा अपमान केल्याचा आरोप करत टीका केली आहे. भाजपचे प्रवक्ते सी. आर. केसवन यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्ट करत माजी पंतप्रधान नेहरूंवर आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. नेहरूंनी 1937 च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नेहरूंनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना लिहिलेली पत्रे शेअर केली.
आपल्या पोस्टमध्ये केसवन म्हणाले की, तरुण पिढीला हे माहीत असणे गरजेचे आहे की नेहरूंच्या अध्यक्षतेखालील काँग्रेसने 1937 च्या फैजपूर अधिवेशनात आपल्या सांप्रदायिक अजेंड्याला पुढे नेत फक्त संक्षिप्त ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. गौरवशाली ‘वंदे मातरम्’ आपल्या राष्ट्राच्या एकतेचा आणि अभिमानाचा आवाज होता. या गीताने मातृभूमीबद्दल आदर निर्माण केला, राष्ट्रभावना जागवली आणि देशभक्तीला चालना दिली. ब्रिटिशांनी हे गाणे गाणे गुन्हा ठरवले होते. हे कोणत्याही धर्माशी संबंधित नव्हते, परंतु काँग्रेसने त्याला धर्माशी जोडून ऐतिहासिक चूक केली. नेहरूंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने देवी दुर्गेचे उल्लेख जाणूनबुजून हटवले.
आपल्या ट्विटर पोस्टमध्ये केसवन यांनी नेहरूंच्या 1 सप्टेंबर 1937 च्या पत्राचा उल्लेख केला आहे, ज्यात नेहरूंनी लिहिले होते की, “वंदे मातरम् मधील शब्द देवीशी संबंधित आहेत, असे मानणे निरर्थक आहे,” तसेच त्यांनी व्यंगात्मक पद्धतीने म्हटले होते की, ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीत म्हणून योग्य नाही.” नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पूर्ण मूळ आवृत्तीचे समर्थन केले होते. मात्र नेहरूंनी 20 ऑक्टोबर 1937 च्या पत्रात लिहिले की, वंदे मातरम्ची पार्श्वभूमी मुसलमानांना दुखावू शकते. तसेच “या गीताच्या विरोधात काही ठोस कारणे दिसतात आणि काही सांप्रदायिक प्रवृत्तीचे लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत.” असेही नेहरू म्हणाले होते.
नेहरूंनी 1937 मध्ये वंदे मातरम गीतातून देवी दुर्गेचा उल्लेख काढून टाकला आणि 2024 मध्ये राहुल गांधींनी ‘शक्ती’ शब्दावर टीका करून हिंदू धर्माविरुद्ध द्वेषपूर्ण टिप्पणी केली. नेहरूंच्या हिंदूविरोधी मानसिकतेचा ठसा राहुल गांधींच्या वक्तव्यांमध्ये स्पष्ट दिसतो असे केसवन म्हणालेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी