
नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांना आवाहन केले आहे की त्यांनी ग्राहकांशी स्थानिक भाषेत संवाद साधावा, ज्यामुळे त्यांच्याशी अधिक जवळीक निर्माण होईल.
यासंदर्भात सीतारामन म्हणाल्या की, बँकांनी क्रेडिट माहिती कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करावे, कारण या कंपन्या डेटा अद्ययावत करण्यास बराच वेळ घेतात, ज्यामुळे अनेकदा ग्राहकांना कर्ज नाकारले जाते. वित्तमंत्र्यांनी स्थानिक भाषा जाणणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यावर भर दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार,स्थानिक ग्राहक बँकांच्या व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या भाषेत बोलणे आवश्यक असल्याची सूचना त्यांनी केली. बँकिंग व्यवस्था ही केवळ आर्थिक व्यवहारांची नाही, तर ती विश्वास आणि जोडणीचे प्रतीक आहे. जर बँका ग्राहकांशी स्थानिक भाषेत संवाद साधतील, तर त्यांच्याशी असलेले नाते अधिक घट्ट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागांमध्ये स्थानिक भाषिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती न करणे ही एक मोठी चूक आहे, कारण स्थानिक ग्राहकांशिवाय कोणत्याही बँकेला आपला व्यवसाय चालविणे अवघड आहे असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी