
इस्लामाबाद, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (पीओके) पुन्हा एकदा शहबाज शरीफ सरकार विरोधात आंदोलन भडकले आहे. नेपाळप्रमाणेच आता पीओकेमध्येही या आंदोलनाचे नेतृत्व जनरेशन-झेड (जेन-जी) ने आपल्या हातात घेतले आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांचे आंदोलन शिक्षण सुधारणा आणि फी कमी करण्याच्या मागणीपुरते मर्यादित होते. परंतु त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी सरकारने लष्कर आणि पोलिसांच्या मदतीने त्यांच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
सोशल मीडियावर समोर आलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये मुझफ्फराबादसह इतर भागांमध्येही विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून घोषणा देताना, तोडफोड करताना आणि टायर जाळताना दिसत आहे. शहबाज शरीफ सरकारविरोधातील या मोठ्या आंदोलनाकडे पाकिस्तानच्या ताब्यातील या भागातील तरुण पिढीतील वाढत्या असंतोषाचे प्रतीक म्हणून पाहिले जात आहे.
अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले गेले आहे की, नेपाळनंतर आता पीओकेमधील जनरेशन-झेडचे हे आंदोलन पाकिस्तान सरकार आणि लष्करासाठी डोकेदुखी ठरले आहे. मुझफ्फराबादमधील एका प्रमुख विद्यापीठात जास्तीच्या फी आणि सुविधांच्या अभावाविरोधात हे आंदोलन सुरू झाले होते. आंदोलन शांततेने सुरू होते, पण प्रशासनाने विद्यापीठातील सर्व राजकीय उपक्रमांवर बंदी घातल्यानंतर वातावरण तापले. परिस्थिती तेव्हा आणखी बिघडली, जेव्हा एका अज्ञात बंदूकधाऱ्याने विद्यार्थ्यांच्या गटावर गोळीबार केला.यामध्ये एका विद्यार्थ्याला दुखापत झाल्यानंतर गोंधळ उडाला.
यापूर्वी एक महिन्यापूर्वीही पीओकेमध्ये अशाच प्रकारची अस्थिरता निर्माण झाली होती. करसवलत, गव्हाच्या आणि वीजेवरील अनुदान तसेच विकास प्रकल्प पूर्ण करण्यासह सुमारे 30 मागण्यांसाठी सुरू झालेल्या त्या आंदोलनादरम्यान पोलिसांच्या गोळीबारात 12 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode