सुदानमध्ये दोन वर्षांनंतर आरएसएफ-एसएएफ युद्धबंदीवर सहमती
खार्तूम, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। सुदानमध्ये तब्बल दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता शांततेची एक किरण दिसू लागली आहे. देशातील अर्धलष्करी संघटना रॅपिड सपोर्ट फोर्स(आरएसएफ) ने जाहीर केले आहे की ती अमेरिकेच्या मध्यस्थी
RSF-SAF agree on ceasefire in Sudan after two years


खार्तूम, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। सुदानमध्ये तब्बल दोन वर्षांपासून सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता शांततेची एक किरण दिसू लागली आहे. देशातील अर्धलष्करी संघटना रॅपिड सपोर्ट फोर्स(आरएसएफ) ने जाहीर केले आहे की ती अमेरिकेच्या मध्यस्थीने सुदानी सेना (एसएएफ ) सोबत युद्धविरामासाठी तयार आहे.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, आरएसएफ ने गुरुवारी सांगितले की ती अमेरिका, सौदी अरेबिया, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या नेतृत्वाखालील “क्वाड” गटाच्या प्रस्तावानुसार मानवीय युद्धविराम स्वीकारण्यास तयार आहे. या युद्धविरामाचा उद्देश देशातील मानवीय संकटावर नियंत्रण आणणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणे हा आहे. तथापि, या घोषणेवर सुदानच्या नियमित सेनेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

अमेरिकेचे अरब आणि आफ्रिकन विषयांचे वरिष्ठ सल्लागार मसाद बुलोस यांनी आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते की दोन्ही पक्षांमध्ये युद्धविरामासाठी चर्चा सुरू आहे आणि त्यांनी तत्त्वतः सहमती दर्शवली आहे. बुलोस यांच्या मते, “कोणत्याही पक्षाने प्रारंभी विरोध दर्शवलेला नाही. आता आम्ही करारातील महत्वाच्या मुद्द्यांवर काम करत आहोत.”

दरम्यान, सेनाप्रमुख अब्देल फतह अल-बुरहान यांनी गुरुवारी आपल्या भाषणात म्हटले की त्यांची सेना शत्रूच्या पराभवासाठी लढत आहे. त्यांनी म्हटले, “आम्ही लवकरच त्यांचा बदला घेऊ ज्यांची हत्या झाली किंवा ज्यांच्यावर अत्याचार झाला त्या सर्व भागांमध्ये जिथे बंडखोरांनी हल्ला केला आहे.”ही घोषणा अशा वेळी आली आहे जेव्हा आरएसएफ वर उत्तर दारफूर राज्याची राजधानी अल-फाशर येथे कब्जा मिळवताना सामूहिक नरसंहार केल्याचा आरोप आहे. २६ ऑक्टोबर रोजी शहरावर नियंत्रण मिळवण्यापूर्वी आरएसएफ ने तब्बल १८ महिन्यांपर्यंत शहराला वेढा दिला होता.

संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार, आरएसएफ च्या ताब्यानंतर ७०,००० पेक्षा अधिक लोकांना अल-फाशर आणि आसपासच्या भागातून पलायन करावे लागले. प्रत्यक्षदर्शी आणि मानवी हक्क संघटनांच्या मते, शहरात सामूहिक हत्याकांड, बलात्कार आणि अत्याचार झाले आहेत.जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) माहितीनुसार, आरएसएफच्या कब्जादरम्यान एका बालरुग्णालयात ४६० पेक्षा अधिक रुग्ण आणि आरोग्यकर्मी मृत्युमुखी पडले.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेनं सप्टेंबरमध्ये सादर केलेल्या अहवालात आरएसएफ आणि एसएएफ दोघांनाही युद्धगुन्ह्यांसाठी जबाबदार ठरवले आहे. अहवालात म्हटले आहे की दोन्ही पक्षांनी नागरिकांवर हल्ले, हत्या आणि लैंगिक हिंसाचारासारखे गंभीर अपराध केले आहेत. सध्या आरएसएफ चा ताबा सुदानच्या पश्चिम आणि दक्षिण भागांवर आहे, तर सेना उत्तर, पूर्व, नाईल नदी आणि लाल समुद्रालगतच्या भागात आपले वर्चस्व राखून आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande