गूगलचा ‘एआय स्किलिंग प्रोग्राम’; भारतातील स्टार्टअप्ससाठी नवी संधी
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। जगप्रसिद्ध कंपनी गूगलने ‘गूगल फॉर स्टार्टअप्स इंडिया’ अंतर्गत दोन आठवड्यांचा ‘एआय स्किलिंग प्रोग्राम’ सुरू करणार आहे. हा विशेष कार्यक्रम देशातील स्टार्टअप टीम्स आणि उद्योजकांना गूगलच्या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (ए
Google AI Skilling Program


मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। जगप्रसिद्ध कंपनी गूगलने ‘गूगल फॉर स्टार्टअप्स इंडिया’ अंतर्गत दोन आठवड्यांचा ‘एआय स्किलिंग प्रोग्राम’ सुरू करणार आहे. हा विशेष कार्यक्रम देशातील स्टार्टअप टीम्स आणि उद्योजकांना गूगलच्या अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) साधनांचा वापर करून प्रोटोटाइप्स विकसित करण्याची संधी देणार आहे. हा उपक्रम 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडणार असून, सहभागींना हँड्स-ऑन ट्रेनिंग, प्रमाणपत्र आणि जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या ‘बिल्ड द फ्युचर’ शोकेसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

गूगलच्या या उपक्रमामागचा उद्देश भारतातील जनरेटिव्ह एआय इकोसिस्टमच्या वाढीस चालना देणे हा आहे. देशातील स्टार्टअप क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत असताना, गूगल पारंपरिक कोडिंग अडथळे दूर करून उद्योजकांना अधिक सोप्या पद्धतीने एआय-आधारित उपाय विकसित करण्यासाठी मदत करत आहे. या प्रोग्रामद्वारे सहभागींना गूगलच्या पूर्ण-स्टॅक एआय इकोसिस्टमचा लाभ मिळणार आहे, ज्यामुळं कल्पनेपासून प्रत्यक्ष प्रोटोटाइपपर्यंतचा प्रवास अधिक जलद आणि परिणामकारक होईल.

गूगलच्या निवेदनानुसार, सहभागींना त्यांच्या कल्पनांना एआय-आधारित कार्यक्षम मॉडेलमध्ये रूपांतरित करण्यासाठी आवश्यक साधने आणि ज्ञान दिले जाईल. या प्रशिक्षणात जेमिनी (Gemini), नॅनो बॅनाना (Nano Banana), इमेजन (Imagen), वियो (Veo), नोटबुकएलएम (NotebookLM) आणि एआय स्टुडिओ (AI Studio) यांसारख्या गूगलच्या प्रमुख एआय साधनांचा समावेश आहे. या साधनांद्वारे सहभागींना कल्पना मांडण्यापासून ते संशोधन, डिझाइन आणि डिप्लॉयमेंटपर्यंतच्या सर्व टप्प्यांमध्ये सहाय्य मिळेल.

या कार्यक्रमाचे तीन मुख्य फोकस क्षेत्र आहेत — एआय-फर्स्ट प्रोटोटायपिंग, एआय-पॉवर्ड रिसर्च आणि एआय क्रिएटिव्ह स्टुडिओ. यात सहभागींना व्यावहारिक कौशल्ये शिकवली जातील, ज्यामुळे ते एआय-आधारित नवकल्पना तयार करू शकतील. कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांना गूगल-मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळेल तसेच ‘बिल्ड द फ्युचर’ शोकेसमध्ये आपले प्रकल्प सादर करण्याची संधी मिळेल. या शोकेसमधील उत्कृष्ट प्रकल्पांना गूगलच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आणि मेंटॉरशिप मिळणार आहे, ज्यामुळे त्यांना व्यावसायिक उंची गाठण्यास मदत होईल.

गूगल फॉर स्टार्टअप्स इंडियाच्या प्रमुख रागिणी दास यांनी सांगितले की, “आमचा उद्देश प्रत्येक संस्थापकासाठी एआय ची शक्ती उपलब्ध करून देणे हा आहे. गूगलच्या पूर्ण-स्टॅक एआय इकोसिस्टमचा उपयोग करून उद्योजकांना त्यांच्या कल्पनांना वेगाने साकार करता येईल.”

हा उपक्रम माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) स्टार्टअप हब, स्टार्टअप इंडिया, इंडियाएआय मिशन आणि नॅसकॉमच्या सहकार्याने राबवला जात आहे. MeitY स्टार्टअप हबचे मुख्य कार्यकारी अधिकारी पन्नीरसेल्वम मदनागोपाळ यांनी सांगितले की, “ही भागीदारी डिजिटल इंडिया आणि विकसित भारताच्या दृष्टीकोनाचं प्रतीक आहे. देशभरातील संस्थापकांना एआय च्या माध्यमातून सामाजिक उन्नतीसाठी जागतिक स्तरावरील उपाययोजना तयार करता याव्यात, हा आमचा उद्देश आहे.”

गूगलनं यापूर्वीही सप्टेंबर महिन्यात तीन महिन्यांच्या ‘एआय अ‍ॅक्सेलरेटर’ प्रोग्रामची नवीन कोहॉर्ट जाहीर केली होती. त्या वेळी 1,600 अर्जांमधून 20 स्टार्टअप्सची निवड करण्यात आली होती, जे आरोग्य, वित्त, हवामान आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत एआय-चालित उपाययोजना तयार करत आहेत.

भारताचा जनरेटिव्ह एआय स्टार्टअप हब म्हणून जागतिक स्तरावर वाढता प्रभाव गूगलसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. सध्या भारतातील जनरेटिव्ह एआय इकोसिस्टममध्ये 3.7 पट वाढ नोंदली गेली आहे. या नव्या एआय स्किलिंग प्रोग्राममुळे देशातील नवीन उद्योजकांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात सहज प्रवेश मिळेल आणि सामाजिक समस्यांवर नवोन्मेषी उपाय शोधण्यास प्रोत्साहन मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande