


मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। इटालियन सुपरबाइक निर्माता डुकाटीनं भारतीय बाजारात आपली सर्वात आक्रमक आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड बाइक ‘मल्टिस्ट्राडा V4 पाईक्स पीक’ सादर केली आहे. ही बाइक स्टँडर्ड मल्टिस्ट्राडा V4 पेक्षा तब्बल पाच लाखांनी महाग असून तिची एक्स-शोरूम किंमत 36.17 लाख रुपये आहे. रेसिंग डीएनए आणि अॅडव्हेंचर टूरिंगचा परिपूर्ण संगम असलेली ही स्पेशल एडिशन बाइक रायडर्सना ट्रॅक आणि रोड दोन्हीवर थरारक अनुभव देणार आहे.
जगप्रसिद्ध पाईक्स पीक हिल क्लाइंब रेसच्या प्रेरणेवर आधारित या नव्या अवतारानं भारतीय सुपरबाइक प्रेमींच्या मनात धडकी भरली आहे. स्टँडर्ड व्हर्जनपेक्षा अधिक स्पोर्टी एर्गोनॉमिक्स, हाय-स्पेक कंपोनंट्स आणि रेस-इन्स्पायर्ड फीचर्समुळं ही बाइक खऱ्या अर्थानं ‘रुलर ऑफ द पीक’ ठरली आहे.
मल्टिस्ट्राडा V4 पाईक्स पीकमध्ये 1,158 सीसीचं V4 ग्रँटुरिस्मो इंजिन देण्यात आलं आहे, जे 10,750 आरपीएम वर 170 एचपी पॉवर आणि 9,000 आरपीएम वर 123 एनएम टॉर्क निर्माण करतं. यात सिलेंडर डिऍक्टिव्हेशन सिस्टीम असून, ती कमी वेगात रियर सिलेंडर बंद करून इंधन कार्यक्षमता वाढवते. यामधील ‘रेस मोड’ थ्रॉटल रिस्पॉन्स अधिक तीव्र करतो आणि ट्रॅक्शन व व्हीली कंट्रोलचा हस्तक्षेप कमी करतो. या बाइकमध्ये टायटॅनियम अक्रापोविक एक्झॉस्ट स्टँडर्ड स्वरूपात दिलं आहे.
सस्पेन्शनसाठी ओहलिन्स स्मार्ट ईसी 2.0 इलेक्ट्रॉनिक सिस्टीम वापरली आहे, जी रायडिंग स्टाइलनुसार आपोआप समायोजित होते. 19 इंचाच्या ऐवजी 17 इंचाचं फ्रंट व्हील दिल्यामुळे बाइकची हँडलिंग अधिक स्पोर्टी झाली आहे. लाइटवेट फोर्ज्ड रिम्सवर पिरेली डायब्लो रोसो IV टायर्स बसवले आहेत, तर सिंगल-साइडेड स्विंगआर्ममुळे बाइकला रेसिंग लूक मिळतो.
ब्रेकिंगसाठी 330 मिमी फ्रंट डुअल डिस्क्सवर ब्रेम्बो स्टाइलमा कॅलिपर्स आणि 280 मिमी रियर डिस्क देण्यात आली आहे. चेसिस डिझाइन अधिक अॅग्रेसिव्ह असून स्टीयरिंग हेड अँगल 24.5 वरून 25.75 डिग्रीपर्यंत वाढवला आहे. फूटपेग्स उंच आणि मागे, हँडलबार अरुंद असल्यामुळे रायडिंग पोझिशन अधिक स्पोर्टी बनली आहे.
इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत डुकाटीनं या बाइकमध्ये अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत. डुकाटी व्हेइकल ऑब्झर्व्हर (डीव्हीओ) सिस्टीम 70 हून अधिक व्हर्च्युअल सेन्सर्सच्या मदतीनं एबीएस, ट्रॅक्शन आणि व्हीली कंट्रोलचा परफॉर्मन्स अचूक राखते. रडार सिस्टीमसह ॲडडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंगची सुविधाही दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule