गुगल मॅप्सनी भारतासाठी नवीन वैशिष्ट्ये केली जाहीर
मुंबई, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। गुगलने भारतातील वापरकर्त्यांसाठी गुगल मॅप्समध्ये तब्बल 10 नवीन वैशिष्ट्यांची घोषणा केली आहे. यामध्ये जेमिनी-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सुविधा, सुरक्षितता आणि व्यत्यय सूचना तसेच नवीन प्रवास पद्धतींचा समावेश आहे. स
Google Maps Announces New Features


मुंबई, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। गुगलने भारतातील वापरकर्त्यांसाठी गुगल मॅप्समध्ये तब्बल 10 नवीन वैशिष्ट्यांची घोषणा केली आहे. यामध्ये जेमिनी-आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सुविधा, सुरक्षितता आणि व्यत्यय सूचना तसेच नवीन प्रवास पद्धतींचा समावेश आहे. सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मॅप्समधील पहिलं हँड्स-फ्री संवादात्मक ड्रायव्हिंग अनुभव, जो जेमिनीच्या व्हॉइस इंटरॅक्शन क्षमतेवर आधारित आहे. या सुविधेमुळे चालकांना स्क्रीनकडे न पाहता रस्त्यावरील स्थानिक ठिकाणे शोधता येतील, ईव्ही चार्जिंग स्टेशन शोधता येईल आणि अपेक्षित आगमन वेळ (ईटीए) मित्रांसोबत शेअर करता येईल.

गुगल मॅप्स आता प्रोएक्टिव्ह लोकल टिप्ससह अधिक उपयुक्त ठरणार आहे. जेमिनी-चालित ही सुविधा वापरकर्त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानाजवळील आकर्षक ठिकाणे, स्थानिक व्यवसाय आणि सांस्कृतिक वारशाची माहिती देईल. ही सुविधा भारतात पर्यटन आणि स्थानिक प्रवास अधिक सोपा आणि रोमांचक करणार आहे. याशिवाय, गुगल मॅप्स आता वापरकर्त्यांच्या प्रश्नांना थेट उत्तर देईल, ज्यासाठी रिव्ह्यू, फोटो आणि इतर माहितीचा वापर केला जाईल. त्यामुळे वापरकर्त्यांना संशोधन किंवा नेव्हिगेशनसाठी दुसरे अ‍ॅप उघडण्याची गरज भासणार नाही.

सुरक्षिततेसाठी गुगलनं अपघात-प्रवण क्षेत्र अलर्ट्स आणले आहेत. सरकारी डेटावर आधारित ही सुविधा अपघात होण्याची शक्यता असलेल्या भागात वापरकर्त्यांना सतर्क करेल. त्याचबरोबर स्पीड लिमिट हायलाइट्सही जोडण्यात आले आहेत, ज्यामुळे चालकांना अधिकृत वेग मर्यादेची माहिती मिळेल. या सुविधा लवकरच देशातील प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध होतील. ट्रॅफिकच्या समस्येवर उपाय म्हणून प्रोएक्टिव्ह ट्रॅफिक अलर्ट्स वैशिष्ट्य आणलं जात असून, यामुळे नेव्हिगेशन सुरू नसतानाही ट्रॅफिक जॅम, रस्ते बंदी किंवा इतर विलंबांबद्दल सूचना मिळतील.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) सोबत गुगलनं भागीदारी केली असून, रिअल-टाइम अधिकृत डेटा आता मॅप्सवर दिसेल. यामुळं रस्ते दुरुस्ती, बंदी आणि पर्यायी मार्गाबद्दल अचूक माहिती मिळेल. या व्यतिरिक्त, मॅप्सवरून थेट मेट्रो तिकीट बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सध्या दिल्ली, बेंगलुरू, कोची आणि चेन्नईमध्ये सुरू असून, मुंबईत लवकरच उपलब्ध होईल. तिकिटे गुगल वॉलेटमध्ये सेव्ह होऊन थेट मॅप्समधून वापरता येतील.

भारतीय रस्त्यांसाठी फ्लायओवर नेव्हिगेशनमध्येही सुधारणा करण्यात आली असून, आता व्हॉइस मार्गदर्शनाचं समर्थन दिलं गेलं आहे. या सुविधेमुळे चालकांना गर्दीत किंवा वेगात स्क्रीनकडे पाहण्याची आवश्यकता राहणार नाही. हँड्स-फ्री नेव्हिगेशन नऊ भारतीय भाषांमध्ये लवकरच उपलब्ध होईल. शेवटी, भारतासाठी विशेष टू-व्हीलर नेव्हिगेशन अवतार जोडले जात आहेत, ज्यामध्ये वापरकर्ते विविध आयकॉन आणि रंग निवडून वैयक्तिकृत अनुभव घेऊ शकतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande