पंतप्रधान मोदींशी माझी चांगली चर्चा सुरू, मी लवकरच भारताला भेट देईन - ट्रम्प
वॉशिंग्टन , 7 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची चर्चा अतिशय चांगली सुरू आहे आणि ते लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात. गुरुवारी माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी ए
पंतप्रधान मोदींशी माझी चांगली चर्चा सुरू आहे, मी लवकरच भारताला भेट देईन - ट्रम्प


वॉशिंग्टन , 7 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची चर्चा अतिशय चांगली सुरू आहे आणि ते लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात.

गुरुवारी माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले, “आमच्यातील संवाद खूप चांगला चालू आहे. त्यांनी (मोदींनी) रशियाकडून तेल खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. मोदी माझे मित्र आहेत, आम्ही सतत बोलत असतो आणि त्यांनी मला भारतात येण्यासाठी आमंत्रित केले आहे. आम्ही लवकरच तारीख ठरवू… पंतप्रधान मोदी एक महान व्यक्ती आहेत आणि मी भारतात येणार आहे.”

जेव्हा त्यांना विचारण्यात आले की ते पुढील वर्षी भारताचा दौरा करतील का, तेव्हा ट्रम्प हसत म्हणाले, “हो शक्य आहे.” तथापि, त्यांनी हेही जोडले की भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावरील चर्चा अद्याप सुरू आहे. ट्रम्प म्हणाले की व्यापाराशी संबंधित काही मुद्द्यांवर मतभेद आहेत, पण आमच्या टीम्स त्यावर काम करत आहेत. दोन्ही देशांदरम्यान काही काळापासून व्यापाराविषयी चर्चा सुरू आहे.

अमेरिकेची इच्छा आहे की भारताने आपले बाजार अधिक खुले करावेत, तर भारताला कृषी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकेकडून काही सवलतींची अपेक्षा आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळातही दोन्ही देशांमध्ये अनेक व्यापारिक करारांवर चर्चा झाली होती, परंतु काही मतभेदांमुळे ती पूर्ण होऊ शकली नव्हती.

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यात दीर्घकाळापासून चांगले संबंध आहेत. २०२० मध्ये ट्रम्प यांनी भारताचा दौरा केला होता, जिथे अहमदाबादमध्ये आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांची प्रशंसा केली होती. आता पुन्हा ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे भारत-अमेरिका संबंधांबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande