
मुंबई, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून मोबाईल रिचार्जचे दर वाढणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) डिसेंबर 2025 पासून आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, ग्राहकांना सध्याच्या तुलनेत सुमारे 10 ते 12 टक्के अधिक पैसे द्यावे लागू शकतात. अद्याप कोणत्याही कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नसली तरी, काही टेक टिप्स्टरच्या एक्स पोस्टनुसार भारतातील मोबाईल डेटा प्लॅनचे दर लवकरच वाढतील, असे संकेत दिले आहेत. त्यांच्या माहितीनुसार, जिओ, एअरटेल आणि Vi हे तिन्ही ऑपरेटर सुमारे 10 टक्क्यांपर्यंत दरवाढ करू शकतात. सध्या 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा देणारा प्लॅन 949 रुपयांना मिळतो, मात्र दरवाढीनंतर त्याची किंमत 999 रुपयांपर्यंत जाऊ शकते.
तसेच दुसऱ्या एक्स पोस्टनुसार, 1 डिसेंबरपासून रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या मते, 199 रुपयांचा प्लॅन सुमारे 219 रुपयांपर्यंत तर 899 रुपयांचा प्लॅन 999 रुपयांपर्यंत वाढू शकतो. तरीदेखील या संदर्भात अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. टेलिकॉम कंपन्यांनी दर वाढवले, तर देशभरातील लाखो मोबाईल वापरकर्त्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. मोबाईल डेटा आणि इंटरनेट हे आता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याने या दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या मासिक खर्चावर होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule