ओपनएआयने अँड्रॉइडसाठी ‘सोरा’ एआय व्हिडिओ जनरेशन अ‍ॅप केलं लाँच
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। ओपनएआयने आपल्या क्रांतिकारी एआय-आधारित व्हिडिओ जनरेशन अ‍ॅप ‘सोरा’चं अँड्रॉइड व्हर्जन अधिकृतपणे लाँच केलं आहे. काही महिन्यांपूर्वी आयओएसवर सुरू झालेल्या या अ‍ॅपचा अँड्रॉइड प्रकार ‘सोरा 2’ मॉडेलवर आधारित असून, हे अ‍ॅप टेक
OpenAI  Sora AI video generation app


मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। ओपनएआयने आपल्या क्रांतिकारी एआय-आधारित व्हिडिओ जनरेशन अ‍ॅप ‘सोरा’चं अँड्रॉइड व्हर्जन अधिकृतपणे लाँच केलं आहे. काही महिन्यांपूर्वी आयओएसवर सुरू झालेल्या या अ‍ॅपचा अँड्रॉइड प्रकार ‘सोरा 2’ मॉडेलवर आधारित असून, हे अ‍ॅप टेक्स्ट प्रॉम्प्ट्सद्वारे वास्तववादी व्हिडिओ क्लिप्स तयार करतं आणि त्यासोबत सिंक्रोनाइज्ड ऑडिओ जोडतं. परंतू , भारतातील वापरकर्त्यांसाठी हे अ‍ॅप अद्याप उपलब्ध नाही. सध्या कॅनडा, जपान, दक्षिण कोरिया, तायवान, थायलंड, अमेरिका आणि व्हिएतनाममधील वापरकर्ते हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरून थेट डाउनलोड करू शकतात.

सोरा अ‍ॅप सोशल मीडिया फीडसारखे कार्य करत असून, वापरकर्त्यांना व्हिडिओ तयार करणे, शेअर करणे आणि रिमिक्स करणे सोपे जाते. सुरक्षितता आणि प्रायव्हसीसाठी विशेष फीचर्स असलेले हे अ‍ॅप भविष्यात अधिक देशांमध्ये विस्तारेल, अशी अपेक्षा आहे. टेक्स्ट-टू-व्हिडिओ तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या अ‍ॅपमध्ये वापरकर्ता फक्त एक वाक्य लिहितो आणि एआय त्यापासून पूर्ण व्हिडिओ तयार करतं. उदाहरणार्थ, “एक सुंदर समुद्रकिनारी सूर्यास्त दृश्य” असा प्रॉम्प्ट दिल्यास, एआय वास्तववादी दृश्यासह लाटांचा आवाज आणि संगीत जोडतं. त्यामुळे हे अ‍ॅप क्रिएटर्स, मार्केटर्स आणि सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरतं.

सोराचं इंटरफेस टिकटॉक किंवा इन्स्टाग्राम रील्ससारखं आहे. अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर वापरकर्त्याला ओपनएआय अकाउंटनं लॉगिन करावं लागतं. मुख्य फीडमध्ये इतर वापरकर्त्यांचे व्हिडिओ पाहता येतात, तर स्वतःचे व्हिडिओ तयार करण्यासाठी फक्त टेक्स्ट प्रॉम्प्ट लिहावा लागतो. एआय 10 ते 60 सेकंदांची क्लिप तयार करतं. वापरकर्ता इमेज अपलोड करून त्यावर आधारित व्हिडिओ बनवू शकतो किंवा ‘कॅमिओज’ फीचरद्वारे स्वतःचा अवतार आणि आवाज रेकॉर्ड करून वैयक्तिक व्हिडिओ तयार करू शकतो.

या अ‍ॅपचं विशेष आकर्षण म्हणजे ‘रिमिक्स’ फीचर. याच्या मदतीनं आधीपासून तयार व्हिडिओंमध्ये बदल करून नवीन कथा तयार करता येतात. अ‍ॅपमध्ये दैनिक क्रिएशन लिमिट्स, पॅरेंटल कंट्रोल आणि अनुचित मजकुराला ब्लॉक करणारी मॉडरेशन सिस्टम आहे. प्रो व्हर्जन ‘सोरा 2 प्रो’मध्ये उच्च दर्जाचे व्हिडिओ, स्थिरता आणि स्टोरीबोर्डिंगसारखी ॲडव्हान्स्ड टूल्स मिळतात, जे प्रोफेशनल क्रिएटर्ससाठी उपयुक्त आहेत.

भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत सोरा अ‍ॅपचा प्रवेश झाल्यास, शिक्षण, मनोरंजन आणि मार्केटिंग क्षेत्रात मोठी क्रांती होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या भारतीय वापरकर्त्यांना या अ‍ॅपसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. ओपनएआयनं स्पष्ट केलं आहे की पुढील काही महिन्यांत अ‍ॅपचा विस्तार अधिक देशांपर्यंत केला जाईल. तोपर्यंत वापरकर्त्यांनी अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया अपडेट्सवर लक्ष ठेवावं, असा सल्ला देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande