वंदे मातरम्’ म्हणजे संकल्पांची सिद्धी - पंतप्रधान
नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारक टपाल तिकिट आणि नाणे जारी केले. त्यांनी सांगितले की ‘वंदे मातरम्’ हा एक मंत्र आहे, एक ऊर्जा आहे आणि एक संकल्प आहे. भारताच
नेरेंद्र मोदी पंतप्रधान


नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मारक टपाल तिकिट आणि नाणे जारी केले. त्यांनी सांगितले की ‘वंदे मातरम्’ हा एक मंत्र आहे, एक ऊर्जा आहे आणि एक संकल्प आहे.

भारताचे राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ची रचना होऊन आज 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक प्रसंगी शुक्रवारी पंतप्रधान मोदी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियम येथे आयोजित ‘वंदे मातरम्’च्या पूर्ण आवृत्तीच्या सामूहिक गायन कार्यक्रमात सहभागी झाले. या वेळी त्यांनी एक स्मारक टपाल तिकिट आणि एक विशेष नाणे प्रकाशित केले. भारत सरकारने या महत्त्वाच्या प्रसंगी संपूर्ण वर्षभर राष्ट्रव्यापी स्मरणोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक दिवसाचे वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले की, वंदे मातरम् हे शब्द एक मंत्र आहेत, एक ऊर्जा आहेत, एक स्वप्न आहेत, एक संकल्प आहेत. वंदे मातरम् म्हणजे मातृभूमी भारतमातेसमोरची साधना आणि आराधना. हे शब्द आपल्याला आपल्या इतिहासाशी जोडतात, वर्तमानाला आत्मविश्वास देतात आणि भविष्यासाठी नवे धैर्य निर्माण करतात. असा कोणताही संकल्प नाही जो आपण सिद्ध करू शकत नाही, असा कोणतेही ध्येय नाही जे आपण भारतवासी गाठू शकत नाही असे मोदी यांनी सांगितले.

तसेच 7 नोव्हेंबर 2025 हा ऐतिहासिक दिवस आहे. हा पवित्र क्षण देशवासीयांना नवी प्रेरणा आणि नवी ऊर्जा देईल. या दिवसाची ऐतिहासिक नोंद म्हणून एक विशेष नाणे आणि टपाल तिकिट जारी करण्यात आले आहे. मी देशातील सर्व महान पुरुषांना आणि भारतमातेच्या संततींना, ज्यांनी ‘वंदे मातरम्’साठी आपले जीवन अर्पण केले, त्यांना श्रद्धांजली वाहतो आणि देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा देतो असे पंतप्रधान म्हणाले. याप्रसंगी पंतप्रधान म्हणाले की, आनंदमठ ही केवळ बंकिमचंद्र चटर्जी यांची कादंबरी नव्हती, तर ते स्वतंत्र भारताचे स्वप्न होते. ‘आनंदमठ’*मधील ‘वंदे मातरम्’चा प्रसंग, त्यातील प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक भावना खोल अर्थाने ओतप्रोत होती आणि आजही आहे. हे गीत पारतंत्र्याच्या काळात लिहिले गेले, पण त्यातील शब्द कधीही गुलामगिरीच्या सावलीत कैद झाले नाहीत. ते सदैव स्वातंत्र्याच्या आणि अभिमानाच्या प्रतीक राहिले. म्हणूनच ‘वंदे मातरम्’ प्रत्येक युगात आणि काळात तितकेच प्रासंगिक आणि अमर असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

‘वंदे मातरम्’च्या रचनेला 2025 मध्ये 150 वर्षे पूर्ण होतात. बंकिमचंद्र चटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी अक्षय नवमीच्या पावन दिवशी हे गीत लिहिले. ‘वंदे मातरम्’ प्रथम ‘बंगदर्शन’ या साहित्यिक पत्रिकेत त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीच्या भाग म्हणून प्रकाशित झाले. मातृभूमीला शक्ती, समृद्धी आणि दिव्यता यांचे प्रतीक दर्शविणारे हे गीत भारताच्या ऐक्य, आत्मसन्मान आणि राष्ट्रभक्तीचे काव्यात्मक प्रतीक बनले आणि लवकरच राष्ट्रनिष्ठेचे अमर चिन्ह ठरले.-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande