मातोश्रीवर ड्रोन फिरल्यानं आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संताप
मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। मातोश्री परिसरात ड्रोन फिरताना दिसल्यानंतर शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त
शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे


मुंबई, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। मातोश्री परिसरात ड्रोन फिरताना दिसल्यानंतर शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “बीकेसी सर्व्हेच्या नावाखाली आमच्या घरावर नजर ठेवली जात आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर लिहिताना गोपनीयतेचा आणि सुरक्षेचा मुद्दा उचलून धरला. “कोणता सर्व्हे एखाद्याच्या घरात डोकावण्याची आणि दिसताच पळून जाण्याची परवानगी देतो?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

या घटनेनंतर माध्यमांनी विचारणा केली असता, एमएमआरडीएने हा ड्रोन बीकेसी परिसरातील सर्व्हेसाठी असल्याचे सांगितले आणि मुंबई पोलिसांची परवानगी असल्याचा दावा केला. मात्र, ठाकरे यांनी हे स्पष्टीकरण फेटाळून विचारलं की, “जर पोलिसांची परवानगी होती, तर रहिवाशांना आधी का कळवले नाही? एमएमआरडीएने केवळ आमच्याच घराचा सर्व्हे केला का संपूर्ण बीकेसीचा?”

ठाकरे यांनी एमएमआरडीएवर भ्रष्टाचार आणि निकृष्ट कामाचा आरोप करत टीका केली. “एमएमआरडीएने ड्रोन उडवण्यापेक्षा आपल्या जमिनीवरील कामाकडे लक्ष द्यावं. अटल सेतू (एमटीएचएल) हे त्यांच्या भ्रष्टाचाराचं जिवंत उदाहरण आहे,” असा टोला त्यांनी लगावला. या प्रकरणानंतर अधिकृत सर्व्हेक्षणांच्या पारदर्शकतेवर आणि नागरिकांच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एमएमआरडीए आणि मुंबई पोलिसांकडून “हा अधिकृत सर्व्हे होता” एवढंच सांगितलं गेलं असून, अधिक तपशील देण्यात आलेले नाहीत. मातोश्री परिसरातील या ड्रोन प्रकरणामुळे राजकीय वाद पेटला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande