
गांधीनगर, 9 नोव्हेंबर (हिं.स.)।गुजरात एटीएसने मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश केला आहे. गुजरात एटीएसने तीन आरोपींना अटक केली आहे, जे हत्यारांच्या देवाणघेवाणीसाठी गुजरातमध्ये आले होते. या तिन्ही संशयितांना गांधीनगरमधील अडालज परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक आरोपी आंध्र प्रदेशचा असून, दोन आरोपी उत्तर प्रदेशचे आहेत. हे तिघेही देशाच्या विविध भागांमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होते.
गुजरात एटीएसने या प्रकरणाबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. एटीएसने सांगितले की, “गुजरात एटीएसने तीन संशयितांना अटक केली आहे. हे मागील एक वर्षापासून एटीएसच्या रडारवर होते. तिघांनाही हत्यारांची पुरवठा करताना अटक करण्यात आली असून, ते देशाच्या विविध भागांत दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत होते.”
चौकशीतून उघड झाले आहे की हे दहशतवादी आयएसआयएस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी जोडलेले आहेत आणि देशात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी कारवाया करण्याच्या तयारीत होते. सध्या या तिघा दहशतवाद्यांची सखोल चौकशी सुरू आहे आणि एटीएस या जाळ्यात सहभागी इतर व्यक्तींचा शोध घेण्याच्या मोहिमेत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode