
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर (हिं.स.) -
भारतीय नौदलाचे जहाज (आयएनएस) सह्याद्री हे बहुपक्षीय ‘लष्करी सराव मालाबार-2025’ मध्ये सहभागी होण्यासाठी उत्तर पॅसिफिकमधील गुआम येथे पोहोचले आहे.
‘लष्करी सराव मालाबार-2025’ मध्ये आयएनएस सह्याद्रीचा सहभाग हा भारताच्या दृढ भागीदारीचे आणि समन्वय अधिक बळकट करण्याच्या, आंतरपरिचालन क्षमतेत वाढ करण्याच्या तसेच प्रादेशिक सुरक्षेचे संरक्षण करण्याच्या सामूहिक निर्धाराचे पुनरुज्जीवन करतो.
देशातच रचना करण्यात आलेली आणि निर्मिती करण्यात आलेली आयएनएस सह्याद्री ही मार्गदर्शित क्षेपणास्त्र सुसज्ज स्टेल्थ फ्रिगेट आहे. ही युद्धनौका ‘आत्मनिर्भर भारत’ या दृष्टीकोनाचे एक उत्तम उदाहरण असून, याने अनेक द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सराव तसेच कार्यात्मक तैनातींमध्ये सहभाग घेतला आहे.
‘लष्करी सराव मालाबार-2025’च्या बंदर टप्प्यामध्ये कार्यात्मक नियोजन आणि चर्चा, संप्रेषण नियमावलीवरील समन्वय, सहभागी देशांमधील परस्पर परिचय भेटी आणि क्रीडा स्पर्धा होतील. बंदर टप्प्यानंतर सर्व सहभागी दल समुद्री टप्प्यासाठी रवाना होतील. यामध्ये जहाजे आणि विमानांचा समावेश असलेल्या नौदल सरावाचे आयोजन केले जाईल. या सरावात संयुक्त नौदल ताफा संचलन, पाणबुडीविरोधी युद्ध, तोफखाना सराव मालिका आणि उड्डाण संचलन यांवर भर दिला जाईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी