
पुणे, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। निवडणुका सुरू झाल्या की आमच्यावर आरोप होतात. आधीही ७० कोटींचे गैरव्यवहार झाल्याचे आरोप होते, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव पार्कमधील जमीन घोटाळ्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पुण्यातील जमीन खरेदीत कथित गैरव्यवहार केल्याचा विरोधकांकडून आरोप होत आहे. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत माध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली.
विरोधकांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. एक रुपयाचा व्यवहार न करता नुसते आकडे देऊन कसा कागद देऊन कसा व्यवहार होऊ शकतो, हे आजपर्यंत मला कळले नाही. नोंदणी कार्यालयातील व्यक्तीने अशी नोंदणी का केली? चुकीचे काम का केले? हे चौकशीअंती आपल्याला कळेल? निवडणुका जवळ आल्या की, आमच्यावर आरोप सुरू होतात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, माझे नातेवाईक असले तरी दबावात चौकशी करू नये. कुणीही चुकीचे केले असल्यास कारवाई करावी. माझ्या राजकीय जीवनात कुठलीही चूक केली नाही. कोरेगाव पार्क कथित जमीन घोटाळा प्रकरणात आमचा एका रुपयाचाही व्यवहार झाला नाही. मुंढवा जमिनीची किंमत २००३ मध्ये दीड लाख रुपये होती. जनतेसमोर या प्रकरणाची लवकरच माहिती येईल. एफआयआर दाखल झाला आहे. मी कालही चुकीचं केलं नाही. पुढेही चुकीचं करणार नाही, असे ठामपणानं त्यांनी सांगितलं.पार्थ पवार यांनी कथित जमीन घोटाळ्याबाबत खुलासा केला नाही. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पार्थनं नाही, पण मी म्हणजे त्याच्या बापानं भूमिका मांडली आहे. चुकीच्या आरोपामुळे बदनामी होते.
मधल्या काळात काही घटना घडल्या. त्याबद्दल मी माझी भूमिका स्पष्ट मांडली आहे. त्या संदर्भात एफआयआर दाखल झाला असून, चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी एका महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. एक रुपयाचा व्यवहार न होता नुसते आकडे लिहून कसा काय कागद तयार होऊ शकतो? हे मला आजवर समजलेलं नाही. त्यामुळे मीही या प्रकाराने आश्चर्यचकित आहे.” असं म्हणत अजित पवार यांनी निबंधकांना आरोपीच्या पिंजाऱ्यात उभं केलं आहे.
अधिकाऱ्यांना आवाहन करताना पवार म्हणाले, “मी नेहमी सांगतो, कोणत्याही दबावाला बळी पडू नका. माझे नातेवाईक, कार्यकर्ते, अधिकारी कोणीही असतील, नियमात न बसणारे काम करू नका. क्लास वन, क्लास टू, आयएएस, आयपीएस सर्वांनी कायद्याप्रमाणे वागावं.” अजित पवार यांनी पुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारामती आणि माळेगाव नगरपंचायतीच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत भाष्य केले. चढ-उतार आले तरी बारामतीकर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, असे सांगत त्यांनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. बारामती आणि माळेगावचा पुढील पाच वर्षांत कायापालट करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पवार यांनी स्थानिक निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढण्याची आपली 1991 पासूनची भूमिका स्पष्ट केली, ज्यामुळे पक्षविरोधी कारवाई करणे सोपे होते. आगामी गुरुवारी बारामती येथे ते राष्ट्रवादी भवनमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. सोमवार ते बुधवारपर्यंत फॉर्म भरण्याऐवजी गुरुवारी फॉर्म भरण्याचे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले, तर इतरांना त्यांच्या इच्छेनुसार अर्ज भरण्याचे स्वातंत्र्य असल्याचे सांगितले. ---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु