राज्यात थंडीची चाहूल, उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम
मुंबई, ९ नोव्हेंबर (हिं.स.) : राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीची जाणीव होऊ लागली आहे. पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश येथे १० नोव्हेंबरपर्यंत शीतलहरीची शक्यता आहे. या शीतलहरीच्या प्रभावाखाली उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ४ अंशां
थंडी धुके


मुंबई, ९ नोव्हेंबर (हिं.स.) : राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीची जाणीव होऊ लागली आहे. पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश येथे १० नोव्हेंबरपर्यंत शीतलहरीची शक्यता आहे. या शीतलहरीच्या प्रभावाखाली उत्तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ४ अंशांनी घट होऊ शकते. तसेच विदर्भांतही येत्या दोन दिवसांमध्ये २ अंशांनी किमान तापमान खाली उतरू शकते. मुंबईमध्ये सध्या पहाटेच्या वेळी गारवा, तर दिवसा मात्र तापलेल्या उन्हाची जाणीव होत आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांत पावसाचे जोर होता. मात्र आता वातावरणातील आर्द्रता कमी झाल्याने आणि पावसासाठी अनुकूल परिस्थिती निवळल्याने तापमानात झपाट्याने घट होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत गारठा आणखी वाढेल आणि थंडी टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात सध्या कोरड्या हवेचा प्रभाव असून, त्यामुळे आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. पण सकाळ-संध्याकाळ तापमानात घट दिसून येईल. परिणामी थंडी वाढेल. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या भागात किमान तापमान 12 ते 15 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये सकाळी लवकर गार वारा जाणवेल, तर कोकणात मात्र तापमान थोडं वाढतं राहील. सकाळी गारठा आणि हलकं धुके असेल, पण दुपारी उबदार ऊन पडेल. दिवसभर हवामान कोरडे आणि स्थिर राहील. संध्याकाळी पुन्हा तापमान घटेल आणि गारवा वाढेल. एकूण महाराष्ट्रात थंडीची खरी सुरुवात झाली असून, दिवसभर ऊन असलं तरी रात्रीच्या वेळी गारठा जाणवेल. पुढील काही दिवसांत ही थंडी आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आज (रविवार) मुंबईत किमान तापमान 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला, तर कमाल तापमान 29.6 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. दिवसा मुंबईतील तापमान 29.6 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे, तर रात्री ते 22 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे. मुंबईत वाऱ्याचा वेग ताशी 8.3 किमी नोंदवण्यात आला. आठवड्याच्या हवामान अंदाजानुसार, सोमवारी 25.3 अंश सेल्सिअस, मंगळवारी 25.3 अंश सेल्सिअस, बुधवारी 25.5 अंश सेल्सिअस, गुरुवारी 25.5 अंश सेल्सिअस, शुक्रवारी 25.8 अंश सेल्सिअस आणि शनिवारी 25.8 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. सूर्य सकाळी 6.42 वाजता उगवेल आणि संध्याकाळी 6.01 वाजता मावळेल. कोकणपट्ट्यात (मुंबईसह) हवामान उबदार पण धुकेदार राहील. पुणे आणि नाशिक विभागात सकाळ-संध्याकाळ गारठा वाढणार आहे. पुढील आठवड्याच्या शेवटी तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

शीतलहरीचा परिणाम उत्तर मध्य महाराष्ट्रावर झाला असून जळगाव येथे शनिवारी 10.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीहून 5 अंशांनी कमी होते. नाशिक येथेही 13.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईमध्ये मात्र 14 नोव्हेंबरपर्यंत कमाल तापमानात फारसा दिलासा मिळेल अशी शक्यता नाही. 32 ते 33 अंशांदरम्यान मुंबईत कमाल तापमान असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande