
बीड, 10 डिसेंबर (हिं.स.)।
आजच्या काळात वृध्दाश्रम सुरू होणे दुर्दैवी आहे. शिक्षण घेऊन सुशिक्षित होणारे अनेकजण आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात. पण दुष्काळातही निसर्गाशी झगडणारा शेतकरी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत नाही. त्यामुळे खरा श्रीमंत शेतकरीच आहे.असे संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष बबन महाराज बहिरवाल यांनी सांगितले.
कडा येथील संतनगरात संत मदन महाराज यांच्या २९ व्या पुण्यतिथीनिमित्त भागवत कथा आणि हरिनाम सप्ताह सोहळा झाला. काल्याच्या कीर्तनप्रसंगी संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष बबन महाराज बहिरवाल बोलत होते
ते पुढे म्हणाले,प्रभू रामचंद्र सावत्र मातेच्या आदेशाने वनवासात गेले. पण आजच्या काळात वृद्धाश्रम सुरू होणं हे दुर्दैव आहे.
संत मदन महाराज हे उघडे परब्रह्म होते. त्यांनी स्वतः उघडे राहून समाजाला भक्ती, प्रेम आणि मायेची ऊब दिली. कपड्यांची पर्वा न करता इतरांना मायेचे पांघरूण दिले. संत हेच समाजाचे खरे गुरु असतात. त्यांनी समाजाला अध्यात्मिक मार्ग दाखवला. देव दिसत नसला तरी संतांच्या अनुभवातून देवत्वाची प्रचीती मिळते. संत मदन महाराजांनी देहाचा लाड कधीच केला नाही. त्यांच्या जीवनातून गुरुचे महत्त्व स्पष्ट होते.
. त्यांनी सांगितलं की, संतांनी समाजाला दिशा दिली. त्यांनी लग्न केले नाही, पण हजारो लग्न लावून दिली. स्वतः उपाशी राहून अनाथ मुलांसाठी वसतिगृह सुरू केले. देहाची पर्वा न करता परमार्थ केला. त्यामुळे चंद्र-सूर्य असेपर्यंत समाज त्यांना विसरणार नाही.
संत समाज आणि देव यांच्यात दुवा निर्माण करतात. संत मदन महाराजांनी समाजात अध्यात्मिक प्रेम निर्माण केलं. त्यांनी हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सुरू करून मराठवाड्यात अध्यात्मिक कार्य केलं. त्यांनी संसाराची घृणा केली. वमन जितकी घृणास्पद वाटते, तितकीच संसाराची घृणा असणारा साधक असतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis