
नवी दिल्ली, 10 डिसेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र सदनाचे निवास आयुक्त ( गुंतवणूक) श्री सुशील गायकवाड यांची आज भारत सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) चे कार्यकारी संचालक व मुख्य सल्लागार श्री. राजेश शर्मा यांनी महाराष्ट्र सदनात भेट घेतली. या बैठकीत महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स, सेल्युलर तसेच सेमीकंडक्टर उद्योगांच्या विस्तारासाठी संभाव्य सहकार्य, गुंतवणूक संधी आणि धोरणात्मक बाबींवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत श्री. राजेश शर्मा यांनी ICEA च्याभारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील प्रगती आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच महाराष्ट्रात सेमीकंडक्टर आणि मोबाइल उत्पादन क्लस्टर विकसित करण्यासाठी राज्य सरकारबरोबर भागीदारीच्या शक्यतेवर भर दिला.
श्री. सुशील गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या नव्या गुंतवणूक धोरणाची वैशिष्ट्ये, उद्योगपूरक वातावरण आणि केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांची माहिती दिली. महाराष्ट्र राज्यात गुंतवणूकदारांसाठी सुलभ वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. ICEA सारख्या नामवंत संस्थांसोबत काम करण्यास शासन उत्सुक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र हे इलेक्ट्रॉनिक्स व सेल्युलर उद्योगांचे देशातील प्रमुख केंद्र आहे. ICEA आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील हे सहकार्य या क्षेत्राच्या जलद वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल असा विश्वास श्री. राजेश शर्मा यांनी भेटीनंतर व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर