
नवी दिल्ली , 11 डिसेंबर (हिं.स.)।गोवा येथील नाइटक्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी लूथरा बंधूंना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले असून त्यांना भारतात आणून न्यायालयीन प्रक्रिया सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. या भीषण आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता. गुरुवारी माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार ही माहिती समोर आली आहे.
गोवा सरकारच्या विनंतीवरूनपरराष्ट्र मंत्रालयाने गौरव लूथरा आणि सौरभ लूथरा यांचे पासपोर्ट रद्द केला आहे. हे दोघे उत्तर गोव्यातील अरपोरा येथे असलेल्या ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाइटक्लबचे सह-मालक आहेत. आग लागल्यानंतर 6 डिसेंबरलाच दोघेही भारतातून पळून गेले होते. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या विनंतीवरून इंटरपोलने ब्ल्यू कॉर्नर नोटिस जारी केली आहे. गोवा पोलिसांच्या तपासात हे उघड झाले की अग्निकांडाच्या वेळीच लूथरा बंधूंनी थायलंडसाठी फ्लाइटचे तिकीट बुक केले होते.एका अधिकाऱ्याने सांगितले, “ज्या वेळी गोवा पोलीस आणि अग्निशमन दल जीव वाचवण्यासाठी आतमध्ये संघर्ष करत होते, त्याच वेळी लूथरा बंधू देश सोडून जाण्याची तयारी करत होते.”
बुधवारी दिल्लीतील एका न्यायालयाने लूथरा बंधूंना तात्पुरती संरक्षण देण्यास नकार दिला. त्यांच्या वकिलांनी दावा केला की लूथरा देशातून पळून गेले नाहीत, तर व्यवसायिक दौर्यावर आहेत आणि ते नाइटक्लबचे मालक नसून फक्त परवाना धारक आहेत. क्लबचे दैनंदिन व्यवस्थापन स्टाफ करतो, त्यामुळे थेट जबाबदारी लूथरा बंधूंवर येत नाही, असे त्यांचे म्हणणे होते.दरम्यान, गोवा पोलिसांनी या प्रकरणात क्लबचे पाच व्यवस्थापक आणि कर्मचार्यांना अटक केली आहे. आग रात्री लागली होती आणि काही क्षणांत संपूर्ण परिसराला वेढून टाकला. भारतीय अधिकारी आता थायलंडच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रत्यर्पणाची प्रक्रिया पुढे नेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode