
पुणे, 10 डिसेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या सुक्ष्म व लघू उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2025 च्या जिल्हा पुरस्काराकरिता पात्र उद्योजकांकडून 31 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी केले आहे.
पुरस्काराचे स्वरुप प्रथम क्रमांकास रुपये 15,000/- रोख रक्कम व मानचिन्ह, तर द्वितीय क्रमांकास रुपये 10,000/- रोख रक्कम व मानचिन्ह देण्यात येणार आहे.
जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या उद्योग घटकाची उद्यम नोंदणी दिनांक ०१ जानेवारी २०२२ पूर्वीची (किमान तीन वर्षांपूर्वीची) असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित सुक्ष्म, लघू उद्योगाने मागील सलग दोन वर्षे उत्पादन प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवलेली असावी. संबंधित उद्योग कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, पुणे येथे विनामूल्य उपलब्ध असून अर्जासंबंधी व पुरस्कारासंबंधी अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी महाविद्यालय आवार, शिवाजीनगर, पुणे येथे किंवा दूरध्वनी क्रमांक 020-25537966 यांच्याशी संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु