
सोलापूर, 11 डिसेंबर (हिं.स.)। राहुल गांधी झोपडपट्टीतील सुफियान आत्तार या तरुणाला इन्स्टाग्रामवरील आमच्या ग्रुपमध्ये सहभागी हो म्हणून १८ जणांनी मारहाण केली. या मारहाणीत एकाने सुफियानच्या कपाळावर व हातावर चाकूने वार केले. त्याच्या फिर्यादीवरून १८ जणांविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. राहुल गांधी झोपडपट्टीतील समीर रोकडा, जिलानी शेख, सिकंदर शेख, आसिफ शेख, साहिर शेख, दाऊद शेख यांच्यासह अन्य १० ते १२ जणांनी इन्स्टाग्रामवर ०४ नावाचा एक ग्रुप तयार केला होता. तर दुसऱ्या काही तरुणांनी ०९ हा ग्रुप तयार केला होता. त्यातील ०९ ग्रुपमध्ये सुफियान सदस्य होता. त्यातून आमच्या ०४ नावाच्या ग्रुपमध्ये ये म्हणून संशयित आरोपींनी मध्यरात्री एकच्या सुमारास सुफियान याला फोनवरून शिवीगाळ केली होती.दुसऱ्या दिवशी चार दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी सुफियान व त्याच्या आत्याचा मुलगा मोहम्मदसाब जावेद शेख यांना पोटफाडी चौकात अडविले. त्यावेळी संशयित आरोपींनी विटाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एकाने सुफियानवर चाकूने वार केले. यात सुफियान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी जखमीच्या आत्याचा मुलगा मोहम्मदसाब शेख याने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड