
जळगाव, 11 डिसेंबर, (हिं.स.) - स्मशानभूमीतून अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची बाब जळगाव तालुक्यातील शिरसोली (प्र.न.) येथील स्मशानभूमीत उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.शिरसोली (प्र.न.) येथील सुमनबाई चावदस पाटील या वृद्ध महिलेचं ९ डिसेंबर रोजी निधन झाल्यानंतर सकाळी त्यांच्यावर शिरसोली गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिसऱ्या दिवशी गुरूवारी प्रथेनुसार अस्थी गोळा करण्यासाठी पाटील कुटुंबिय सकाळी आठ वाजता स्मशानभूमीत गेले. मात्र, त्या ठिकाणी मृत सुमनबाई पाटील यांच्या डोक्याखालील भागाची राख आणि अस्थी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे दिसून आले.धक्कादायक बाब म्हणजे सुमनबाई पाटील यांच्या अंगावरील सुमारे दीड ग्रॅमचे दागिने देखील अज्ञात चोरट्याने लंपास केले होते. या घटनेनंतर पाटील कुटुंबियांसह ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून अज्ञात चोरट्याला पकडून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. दरम्यान दीड-दोन महिन्यापूर्वी जळगाव शहरातील मेहरूण आणि शिवाजीनगर स्मशानभूमीत सोन्याच्या लालसेने अस्थींची चोरी झाल्याचे प्रकार उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. जिल्ह्यात सोन्याच्या लालसेपोटी अस्थी चोरी होण्याचे प्रकार वाढताना दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर