
रत्नागिरी, 11 डिसेंबर, (हिं. स.) : येथील खल्वायन संस्थेची 320 वी मासिक संगीत सभा येत्या शनिवारी, दि. 13 डिसेंबर रोजी पुण्याची कु. सावनी शिखरे रंगविणार आहे.
कै. विमलाबाई बळवंत लेले आणि कै. द्वारकानाथ सीताराम बाळ स्मृती मासिक संगीत सभा म्हणून साजऱ्या होणाऱ्या या संगीत सभेत पुण्याची उदयोन्मुख युवा गायिका कु. सावनी शिखरे हिच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच अभंग- नाट्यगीतांच्या सादरीकरण होणार आहे.
सावनीचे शास्त्रीय गायनाचे शिक्षण वयाच्या दहाव्या वर्षापासून विदुषी मंजूषा पाटील यांच्याकडे सुरू झाले. त्यानंतर 2017 पासून समीहन कशाळकर आणि पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांच्याकडून तिने मार्गदर्शन घेतले. भारती विद्यापीठातून तिने एम. ए. (म्युझिक) ही पदवी प्राप्त केली आहे. एमआयटी विश्वशांती गुरुकुलची शिष्यवृत्ती तिला मिळाली आहे. भारत सरकारची 2018-19 या वर्षी तसेच पुणे भारत गायन समाजाची कै. शीला जोशी शिष्यवृत्ती तिला प्राप्त आहे. सिटी- एन पी सीएमधील महोत्सवात तसेच संगीत दरबार कोल्हापूर, युवा संगीत संमेलन पुणे, ठाणे, नवी दिल्ली इत्यादी ठिकाणी तिचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहेत.
रत्नागिरीतील कार्यक्रमाला तबला साथ रत्नागिरीतील प्रसिद्ध वादक प्रथमेश शहाणे व हार्मोनियम साथ पुण्यातील प्रसिद्ध वादक तन्मय देवचके यांचे शिष्य अथर्व कुलकर्णी करणार आहेत.
शनिवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत नेहमीप्रमाणेच रत्नागिरीत सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. सर्व रसिकांना ही मैफल नेहमीप्रमाणेच विनाशुल्क असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी